श्रीकृष्णजन्माष्टमी व्रताचे माहात्म्य, कथा आणि विधी !
उद्या (२६ ऑगस्ट २०२४) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. त्या निमित्ताने…
‘आपण सर्व जण ‘श्रावण कृष्ण अष्टमी’, हा दिवस ‘जन्माष्टमी’ म्हणून साजरा करतो. ‘या दिवसाचे धर्मशास्त्रानुसार माहात्म्य काय ? या दिवशी व्रत म्हणून काय करता येईल ?’, याविषयीची माहिती पुढे दिली आहे.
१. माहात्म्य
जन्माष्टमीचे व्रत करणारी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला प्रिय होते आणि साहजिकच तिच्यावर भगवान श्रीकृष्णाची कृपा झाल्याने विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीचीही सर्वार्थांनी कृपा होते, उदा. त्याच्याकडे धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी इत्यादी सदैव रहातात.
२. कथा
२ अ. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला जन्माष्टमीची कथा आणि व्रत यांविषयी विचारणे : राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, ‘‘हे अच्युत, ज्या दिवशी आपले पूजन केले जाते, अशा जन्माष्टमीची कथा आपण विस्तृतपणे सांगा. ‘जन्माष्टमीचे व्रत कसे करायचे आणि त्याचे फळ काय आहे ?’, हेही सांगा.’’
२ आ. श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर वसुदेव आणि देवकी यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येणे अन् ‘आमच्या जीवनाचा उद्धार झाला’, असे त्यांनी सांगणे : केशव (श्रीकृष्ण) म्हणाला, ‘‘हे पांडवज्येष्ठा (सर्व पांडवांमध्ये ज्येष्ठ असलेल्या हे युधिष्ठिरा), जेव्हा माझे मथुरेत कंस आणि चाणूर यांच्याशी मल्लयुद्ध होऊन माझा विजय झाला, तेव्हा सर्व मथुरावासी बांधवांनी आनंद साजरा केला. दुष्टात्मा कंसाचा वध झाला. या अत्यंत आनंददायक स्थितीत देवकीमाता मला आलिंगन देऊन आनंदाश्रू गाळू लागली. त्या ठिकाणी माझे पिता, म्हणजेच वसुदेव यांच्या नेत्रांतूनही अत्यंत वात्सल्यभावामुळे अश्रू येऊ लागले. त्यांनीसुद्धा ‘हे पुत्र’, असे म्हणत मला आलिंगन दिले. प्रेमाच्या अश्रूंनी भरलेले नेत्र आणि भरून आलेल्या हृदयाने बलरामाला प्रेमपूर्वक आलिंगन देऊन वसुदेव आदरपूर्वक म्हणाले, ‘‘आज आमच्या जन्माचा उद्धार झाला. आज आमच्या जीवनात पालट झाले; कारण आज आम्हाला तुम्ही दोघे भेटलात.’’ हे राजन्, त्या वेळी देवकी आणि वसुदेव हे तृप्त होते. त्यांचा आनंद मी वर्णन करू शकत नाही.’’
२ इ. मथुरावासियांनी श्रीकृष्णाला त्याचा जन्मोत्सव साजरा करण्याची संधी देण्याविषयी प्रार्थना करणे आणि श्रीकृष्णाच्या आदेशाने वसुदेवाने लोकांना जन्माष्टमीचे व्रत सांगणे : भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाला, ‘‘अत्यंत आनंदी झालेले सर्व मथुरावासी त्या महोत्सवामध्ये मला नमस्कार करत म्हणाले, ‘‘हे सर्व दुःखी लोकांचे दुःख नष्ट करणार्या कृष्णा, तू अनुग्रह (कृपा) कर.’’ ‘हे जनार्दना, ‘ज्या दिवशी देवकीने तुला जन्म दिला, त्या दिवशी तुझा जन्मोत्सव साजरा करण्याची आम्हाला संधी दे’, अशी प्रार्थना अनेक लोकांनी मला केली. त्या वेळी माझे पिता वसुदेव यांनीसुद्धा माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला आणि त्याद्वारे त्यांनी (माझ्या जन्मोत्सवाचा) तो दिवस पुन्हा बघण्याची त्यांची अभिलाषा प्रगट केली. मला आणि बलरामाला बघून त्यांचे शरीर रोमांचित झाले. नंतर माझ्या आदेशाने माझे वडील वसुदेव यांनी लोकांना जन्माष्टमीचे व्रत सांगितले. हे पार्थ, मथुरेमध्ये अशा प्रकारे झालेले व्रत लोकांना समजले आणि तेव्हापासून सर्वत्रच्या लोकांनी ते व्रत करण्यास आरंभ झाला.’’
२ ई. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जन्माष्टमीच्या व्रताविषयी विस्तृतपणे सांगणे : पुढे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, ‘‘माझ्या जन्माष्टमीच्या दिवशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यासहित गर्भवती स्त्रिया यांनीसुद्धा हे व्रत करावे.’’
राजा युधिष्ठिराने मधुसूदनाला (श्रीकृष्णाला) विचारले, ‘‘हे केशव, जन्माष्टमीनामक पवित्र व्रत सर्व मथुरावासी प्रजा अनेक वर्षां पासून करते. ते सर्व पापांना नष्ट करणारे व्रत कोणत्या प्रकारे केले जाते ? हे केशव, जे व्रत केल्याने आपण प्रसन्न होता, अशा जन्माष्टमीच्या व्रताचा विधी विस्तृतपणे सांगा.’’ त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या व्रताविषयी विस्तृतपणे सांगितले.
३. हे व्रत कधी करावे ?
श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हे व्रत करावे. ‘या अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल, तर त्याचे फळ अधिक मिळते’, असे काही ग्रंथांत आढळते. या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचे पूजन करण्यास सांगितले आहे.
४. वर्ष २०२४ मधील गोकुळाष्टमीविषयीची माहिती
वरील माहितीनुसार या वर्षी यंदाची जन्माष्टमी २६.८.२०२४ या दिवशी आहे. तेव्हा केवळ जन्माष्टमी नसून ‘जयंती योग’ आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र साधारण दुपारी ४ वाजता आरंभ होणार आहे. त्यामुळे श्रीकृष्णपूजनाचा काळ रात्री साधारण १२.१५ ते १.१५ असा घ्यावा. (साधारण सर्वत्र समज आहे, ‘श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला, म्हणजे आताच्या घड्याळानुसार रात्री १२ वाजता झाला’; मात्र मध्यरात्रीचा कालावधी काढण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले आहे, ‘सूर्यास्त ते सूर्याेदय या कालावधीचा (ज्याला ‘रात्रीमान’, असेही म्हणतात) मध्यकाल काढावा. त्यानुसार वरीलप्रमाणे मध्यरात्रीचा काल येतो.)
– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन वेदपाठशाळा (१८.८.२०२४)
वाचकांना विनंती !‘वरील लेख ‘व्रतराज’, ‘निर्णयसिंधु’ आणि ‘धर्मसिंधु’ या ग्रंथांचा संदर्भ घेऊन केलेला आहे. याविषयी वाचकांकडे अन्य काही संदर्भ असल्यास किंवा त्यांना अन्य काही प्रथा-परंपरा ठाऊक असल्यास ८१८०९६८६६० या क्रमांकावर आम्हाला ‘व्हॉट्सॲप’द्वारे अवश्य कळवाव्यात. श्रीकृष्णजन्माष्टमीची पूजा करण्याचा सविस्तर विधी सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड केलेला आहे. वाचक त्याप्रमाणे पूजा करू शकतात.’ संकेतस्थळाची लिंक : https://shorturl.at/iLKuJ – श्री. सिद्धेश करंदीकर |