जीवनातील गुरूंचे महत्त्व आणि फुलाच्या पाकळीपेक्षा फुलाचा देठ होण्याचा देवाने सांगितलेला भावार्थ

१. केवळ एका जन्मातील आईला महत्त्व न देता जन्मोजन्मीच्या आईरूप परमेश्वराचा विचार करून साधना करणे महत्त्वाचे असणे

‘एकदा साधनेचे महत्त्व नसणार्‍या काही जणांनी मला विचारले, ‘‘तू आई-वडिलांना सोडून आणि त्यांना त्रास देऊन साधना का करत आहेस ?’’ तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर मला देवाने सुचवले, ‘आई-वडील, भाऊ-बहीण इत्यादी नाती प्रारब्धानुसार निर्माण होतात आणि ती या जन्मापुरतीच असतात.’ आईला वाटते की, ‘आपली मुलगी जिवाचा तुकडा असल्याने तिने साधना करण्यासाठी दूर न जाता माझ्याजवळ रहावे.’ देवाने तर त्याच्या आत्म्याचा तुकडा दिला आहे. परमात्म्याच्या अंशापासून आत्मा बनतो ना ! प्रत्यक्षात आपण परमेश्वराचा अंश असतो, म्हणजे परमेश्वर ही आपली जन्मोजन्मीची आई असते. त्या आईशी एकरूप होण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. यावरून ‘केवळ एका जन्मातील आईचा विचार न करता जन्मोजन्मीच्या आईरूपी परमेश्वराचा अधिकाधिक विचार करणे आणि त्यासाठी साधना करणे योग्य आहे.’ हा विचार केल्यास आपोआप ‘योग्य काय आणि अधिक योग्य काय ?’, याची जाणीव होईल.

२. फुलाची पाकळी होण्याऐवजी पाकळ्यांना आधार देणारे आणि भगवंताच्या अधिक जवळ असणारे देठ होण्याचा विचार येणे अन् देवाने साधिकेचा सेवेतील अहं नष्ट होण्यासाठी हा विचार दिल्याचे तिला सांगणे

माझ्यातील अहंमुळे ‘माझी सेवा इतरांपेक्षा अधिक चांगली आहे’, असे मला वाटत होते. त्यानंतर मी काही कारणांसाठी आश्रमाच्या मार्गिकेतून जातांना माझे वाटिकेतील गुलाबाच्या फुलाकडे लक्ष गेले. त्या फुलाच्या पाकळ्या सुंदर होत्या. त्या वेळी देव आणि माझ्यात सूक्ष्मातून पुढील संभाषण झाले.

देव : तुला फुलातील कोणती पाकळी व्हायला आवडेल ?

मी : मला कुठलीच पाकळी व्हायचे नाही, तर मला सर्व पाकळ्यांना जोडून ठेवणारा देठ व्हायचे आहे.

देव : अगं, तुझ्या मनातील ‘मला महत्त्व मिळावे’, हा विचार नष्ट करण्यासाठी देठ होण्याचा विचार मनात आला आहे. सर्वच साधक त्या सुंदर पाकळ्यांप्रमाणे आहेत. त्यांच्या पुढे मी माझे अस्तित्व विसरून सर्वांना एकत्र घ्यायला हवे. बाह्यत: देठ कुणाला दिसत नाही, तरी भगवंताला फूल अर्पण केल्यावर देठ त्याच्या सर्वांत जवळ असतो आणि तेच तर तुझे ध्येय आहे. यातून तुला अहं नष्ट करण्याचे महत्त्व समजले ना ?

मी : हो.

परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपण मला हे अनुभवायला दिले; म्हणून कृतज्ञ आहे !’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२३)