गणेशोत्सव मिरवणुकीवर घातलेले निर्बंध शिथिल करा ! – शिवसेना शिष्टमंडळाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर – श्री गणेशचतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी मिरवणुका काढण्याची अनुमती मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनाअनुमती मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करण्याची चेतावणी पोलीस प्रशासनाने दिली आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांत अशा प्रकारचा निर्णय घेतला नसून केवळ कोल्हापूर शहरात या नियमाची कार्यवाही केली जाणार आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याने गणेशोत्सव मिरवणुकीवर घातलेले निर्बंध शिथिल करा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले.
निवेदन देतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले, ‘‘कोल्हापूरच्या गणेशोत्सवास शतकोत्तर परंपरा लाभली आहे. या कालावधीत शहरातील वातावरण भक्तीमय असते. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेही मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. एकाच दिवशी पारंपरिक वाद्य, ध्वनीयंत्रणा उपलब्ध होत नाही. प्रशासनाने आडमुठेपणा केल्यास मंडळांना अडचणी निर्माण होतील. तरी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.’’ या वेळी शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रमेश खाडे, अमोल माने यांसह अन्य उपस्थित होते.