पुणे महापालिकेमध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याला माजी नगरसेविकेची मारहाण !
पुणे – महापालिकेकडून बाणेर येथे ‘आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थिंनीं’साठी वसतिगृह बांधण्याचे कार्य चालू आहे. ते काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या कामाच्या निविदेविषयी तक्रारी करून अडथळा निर्माण केला, तसेच उद्धट वर्तन करणार्या, माहिती अधिकाराचा अपलाभ घेणार्या एका व्यक्तीला भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेमध्येच चपलेने मारहाण केली. हा कार्यकर्ता राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्याचा विशेष माणूस असल्याचे समजते.
वसतिगृहाच्या निविदेचा पाठपुरावा करण्यासाठी राजश्री काळे या महापालिकेमध्ये आल्या होत्या. त्या वेळी या कार्यकर्त्याने ‘तुझे काम मी होऊ देणार नाही. कार्यादेश कसे निघतात ? ते मी बघतोच ?’, अशी धमकी दिली. त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळाने तो कार्यकर्ता एका अधिकार्याच्या दालनामध्ये घुसला. तेथे राजश्री काळे बसल्या होत्या. तेव्हा काळे यांनी त्याला चपलेने मारहाण केली. त्या वेळी तिथे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश घोष हे आले. त्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.
माजी नगरसेविका राजश्री काळे म्हणाल्या, ‘‘आदिवासी मुलांसाठी वसतिगृह बांधले जात असतांना हा कार्यकर्ता मुद्दाम अडवणूक करतो. माझ्याशी उद्धटपणे बोलून धमकी दिल्याने त्याला मारहाण केली. तो सगळ्यांनाच माहिती अधिकाराच्या आडून त्रास देत असतो.’’ (माहिती अधिकाराच्या नावाखाली इतरांना त्रास देणार्यांचे प्रमाण वाढले आहे, त्याविषयी काय उपाययोजना काढता येतील ? हे प्रशासनाने पहावे. त्याचप्रमाणे मारहाण करणे कितपत योग्य ? हे माजी लोकप्रतिनिधीने पहावे. – संपादक)