गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती
१. ‘विविधांगी सेवा मिळण्याची मुख्य कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे वाटणे
‘मी वर्ष २००३ पासून मुख्यतः ग्रंथांशी संबंधित सेवा करत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला मजकुराचे संकलन करायला शिकवले. या मुख्य सेवेच्या जोडीला मला एकेक करून अन्य सेवा मिळत गेल्या. ‘याची कारणे माझ्यातील ‘जिज्ञासा’ हा गुण आणि प्रामुख्याने ‘गुरुकृपा’ ही आहेत’, असे मला वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासांवर हातांच्या बोटांची मुद्रा, चक्रांवरील न्यास आणि नामजप शोधून द्यायचे. ‘ते हे आध्यात्मिक स्तरावरील उपाय कसे शोधतात ?’, याची मला उत्कंठा होती. वर्ष २००७ पासून मीही त्याचा सराव करू लागलो. मी ‘चक्रांवर त्रासाची स्पंदने कशी जाणवतात ?’, हे पहायचो, तसेच नामजप शोधायचा प्रयत्न करायचो. नंतर माझी पत्नी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या साधकांना नामजपादी उपाय सांगू लागल्या. वर्ष २०१० मध्ये त्या मला म्हणाल्या, ‘‘आता तुम्ही साधकांना नामजपादी उपाय सांगा.’’ मला त्यातील फारसे काही कळत नव्हते; पण ‘पाण्यात ढकलले की, पोहायला आपोआपच येते’, याप्रमाणे माझ्यावर नामजपादी उपाय सांगण्याचे दायित्व आल्याने मला त्यातील थोडे थोडे येऊ लागले. पुढे वर्ष २०११ मध्ये मी गुरुकृपेने संतपदी आरूढ झाल्यावर नामजपादी उपाय सांगण्याचे दायित्व गुरुदेवांनी माझ्यावर सोपवले. वर्ष २०१७ मध्ये ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’वर सनातनचे ग्रंथ निघाल्याने त्रासांवर त्याप्रमाणे उपाय सांगणे सोपे झाले.
कल्पनातीत आणि अप्रतिम लेख लिहिणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा हा लेख वाचून मला थक्क व्हायला झाले ! यात दिलेले ज्ञान जगात कुणालाच नसेल ! भारतीय संगीतातील मोठमोठ्या संगीततज्ञांनाही हा लेख वाचून आश्चर्यच वाटेल ! ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी हे ज्ञान जगभरातील जिज्ञासू साधकांना शिकवून त्यांच्यासारखे अनेक उपाय करणारे तयार करावेत. त्यामुळे जगभरच्या संगीताने बर्या होणार्या साधकांना उपाय उपलब्ध होतील’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले
त्यानंतर नामजपादी उपाय सांगण्याची माझी व्याप्ती वाढत गेली. एखाद्या साधकाचा अपघात झाल्यास किंवा त्याला रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात ठेवले असल्यास त्या कठीण प्रसंगीही मला उपाय सांगावे लागले. प्रसारसेवा, संगणकीय सेवा, घर किंवा भूमी यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार इत्यादींमधील विविध समस्यांसाठी साधक मला आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारू लागले. अशा विविध प्रकारच्या अडचणींविषयी साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारल्याने माझ्यातील सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढण्यास साहाय्य झाले.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ईश्वराकडून ज्ञान मिळायचे, तसेच त्या एखाद्या अध्यात्माविषयीच्या घटनेचे सूक्ष्म परीक्षणही करायच्या. यांविषयीही मला उत्कंठा होती. ‘सूक्ष्मातील कसे जाणता येते ? सूक्ष्मातून उत्तरे कशी मिळतात ? आपल्यालाही सूक्ष्मातील कळू शकेल का ?’, असे प्रश्न मला पडायचे. माझ्या या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठीच कि काय, मला गुरुकृपेने त्या संदर्भातील काही सेवा मिळाल्या, उदा. गायन, वादन, नृत्य यांचे विविध प्रयोग, ध्वनीमुद्रित केलेल्या विविध नामजपांचे प्रयोग, विविध वस्तू, प्राणी यांचे सात्त्विकतेच्या दृष्टीने घेतलेले प्रयोग इत्यादींमध्ये सहभागी होऊन सूक्ष्मातून जे जाणवते, त्याचे लिखाण करणे.
अशा प्रकारे माझ्या सेवांची व्याप्ती वाढत गेली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला माझ्या सेवांच्या व्याप्तीविषयी लिखाण करण्यास सांगितले. त्यांचे आज्ञापालन म्हणून मी माझ्या सेवांची व्याप्ती येथे देत आहे.
२. आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगणे
मी गेली १२ वर्षे साधकांना आध्यात्मिक त्रासांवर न्यास, मुद्रा आणि नामजप शोधून देत आहे. यासाठी मला सर्वत्रचे साधक संपर्क करतात. सध्या मला प्रतिदिन ५० ते ६० साधकांना नामजपादी उपाय सांगावे लागतात. यासाठी मला साधारण ४ घंटे लागतात. कोरोना महामारीच्या काळात हे प्रमाण १०० हून अधिक होते. उपाय सांगण्याची सेवा करतांना मला पुढील गोष्टी शिकता आल्या.
अ. साधकांच्या त्रासांवर उपाय शोधून देतांना कधी कधी वाईट शक्तींनी साधकावर आणलेल्या त्रासदायक (काळ्या) शक्तीच्या आवरणामुळे त्या साधकाला एखाद्या चक्रावर असलेला त्रास मला जाणवायचा नाही. तेव्हा सतर्कतेने परीक्षण केल्यावर मला लक्षात यायचे, ‘वाईट शक्ती मला फसवत आहेत.’
आ. ‘एखाद्या साधकावर त्रासदायक शक्तीचे आवरण आहे’, हे वाईट शक्ती मला कधी कधी कळू द्यायच्या नाहीत. त्यामुळे साधकांसाठी उपाय शोधतांना सतर्क रहावे लागायचे.
इ. साधकांसाठी नामजपादी उपाय शोधतांना मला देवाने काळानुसार उपायांच्या वेळी न्यास करण्याच्या ‘आज्ञाचक्र’ या मुख्य स्थानामध्ये होत गेलेले पालट लक्षात आणून दिले. त्यामध्ये ‘आज्ञाचक्रावर उपाय करण्यापेक्षा डोळ्यांवर उपाय करणे अधिक महत्त्वाचे आहे’, असे लक्षात आले; कारण आपण डोळ्यांद्वारे सर्व जग पहात असल्याने त्यांद्वारे चांगली वा वाईट शक्ती सहजतेने आपल्या शरिरात ग्रहण होते.
ई. पुढे लक्षात आले की, आज्ञाचक्र किंवा डोळे यांवर उपाय करण्यापेक्षा डोक्यावर उपाय करणे अधिक परिणामकारक आहे; कारण डोक्याचा भाग हा मेंदूशी संबंधित असतो आणि मेंदू हा आपल्या कृतींचे नियोजन करतो. त्यामुळे वाईट शक्ती साधकाच्या मेंदूवर आक्रमण करून त्याच्या कृतींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. सध्या काळानुसार वाईट शक्ती शारीरिक स्तरावर अधिक प्रमाणात आक्रमण करत आहेत.
२ अ. गुरुकृपेने वेगवेगळ्या विकारांवर देवतांचे नामजप शोधणे : ‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. मार्च २०२० मध्ये ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावर मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत. मी शोधलेले हे जप साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांच्या अनुभवांवरून लक्षात आले. मी आतापर्यंत (मार्च २०२४ पर्यंत) शारीरिक आणि मानसिक विकारांवर मिळून एकूण २५० विकारांवर देवतांचे नामजप शोधून काढले आहेत.
३. दुसर्यांसाठी नामजपादी उपाय करणे
काही साधक तीव्र शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासामुळे काही वेळा स्वतः नामजपादी उपाय करू शकत नाहीत. तेव्हा त्यांच्यासाठी उपाय करावे लागतात. काही वेळा दायित्व असलेला साधक किंवा संत एखाद्या महत्त्वाच्या समष्टी सेवेमध्ये असतात. तेव्हा वाईट शक्ती आक्रमण करून त्यांना त्रास देत असल्याचे लक्षात येते. त्या वेळी त्यांना समष्टी सेवा करणे कठीण जाते. तेव्हा त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करणे आवश्यक असते. समष्टी सेवेमधील संत किंवा साधक यांना त्रास होत असतांना त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करतांना मला ‘समष्टी सेवेची संधी मिळाली’, याविषयी कृतज्ञता वाटते. उपाय करतांना मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांतील काही संक्षिप्तपणे येथे देत आहे.
अ. वाईट शक्तींनी शरिरावर त्रासदायक शक्तीचे आवरण आणले असेल, तर नामजप, मुद्रा आणि न्यास यांद्वारे उपाय करण्याआधी आवरण काढायला हवे, नाही तर उपायांचा परिणाम होत नाही.
आ. वाईट शक्तींनी आणलेले आवरण विविध आकारांचे जाणवते, उदा. डोक्यावर टोपीसारखे, डोक्याभोवती ‘हेल्मेट’ सारखे, शरिरासमोर पडद्यासारखे, शरिरावर आलेला आवरणाचा पट्टा, संपूर्ण शरिरावर बुरख्यासारखे आवरण इत्यादी.
इ. आवरण काढण्यासाठी ‘एक तळहात आपल्या दिशेने आणि त्यावर मागील बाजूस दुसरा तळहात बाहेरच्या दिशेने येईल असा ठेवून केलेली मुद्रा’ आणि ‘दोन्ही हातांच्या मधल्या बोटांची टोके जोडून केलेली ‘मनोरा मुद्रा’ या मुद्रांचा शोध मला गुरुकृपेने लागला.
ई. चक्रांवर उपाय करतांना काही वेळाने वाईट शक्तीचा त्रास न्यून झाल्यावर पुन्हा नामजप शोधून उपाय केल्यास आणि ही प्रक्रिया त्रास न्यून होण्याच्या प्रत्येक टप्प्याला पुनःपुन्हा केल्यास त्रास जलद गतीने पूर्णपणे दूर होतो. याचे कारण म्हणजे त्रासाच्या प्रत्येक टप्प्याला वाईट शक्तींच्या त्रासाच्या ऊर्जेचा स्तर आणि त्या त्रासासाठी अचूक शोधलेल्या नामजपाचा स्तर एकसारखा असल्यामुळे उपाय परिणामकारक होतात.
उ. चक्रांवरील वाईट शक्तीचा त्रास पूर्णपणे दूर झाला, तरी डोळ्यांमध्ये त्रासदायक शक्ती शेष रहाते आणि डोळ्यांवर उपाय करून तीही पूर्णपणे दूर करणे आवश्यक असते.
ऊ. उपाय करतांना मधे मधे केवळ श्वासावर लक्ष ठेवून २ – ३ मिनिटे ध्यान लावल्यास निर्गुण स्तराचे उपाय होऊन त्रास लवकर न्यून होतो.
ए. उपाय करतांना शरणागतभाव ठेवल्यास परिणामकारक उपाय होऊन त्रास लवकर अल्प होतो.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.४.२०२४)
(क्रमश: पुढच्या रविवारी)
|