रक्ताचे नमुने पालटणार्या सर्वच आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला !
पुणे कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण
पुणे – ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीनांच्या वैद्यकीय पडताळणी करण्यापूर्वी रक्ताचे नमुने पालटल्याने आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायाधिशांनी फेटाळले. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल, ‘ससून’चे आधुनिक वैद्य अजय तावरे, आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अमर गायकवाड हे आरोपी येरवडा कारागृहात असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
अपघातातील ‘पोर्शे’ कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांनी ‘बाल न्याय मंडळा’मध्ये अर्ज केला. त्या अर्जावर २८ ऑगस्ट या दिवशी सुनावणी होणार आहे. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये असलेल्या अन्य २ अल्पवयीन मुलांचेही रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी आदित्य सूद आणि आशिष मित्तल यांना अटक केली आहे, तर अरुणकुमार सिंह हा पसार झाला आहे; परंतु सिंह याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर २२ ऑगस्ट या दिवशी युक्तीवाद झाला असला, तरी अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.