टॅक्सी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असून चिथावणीला बळी पडू नये ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन
पणजी, २३ ऑगस्ट (वार्ता.) – मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सीव्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. टॅक्सी व्यावसायिकांनी याला बळी पडू नये. टॅक्सी व्यावसायिकांचे मोपा विमानतळावरील ‘पार्किग शुल्क’ (वाहन उभे करण्यासाठीचे शुल्क) अल्प करणे आणि पार्किंगसाठी वेळ वाढवून देणे, हे दोन्ही प्रश्न मी सोडवले आहेत. टॅक्सीचालकांनी अजूनही त्यांच्या समस्या असल्यास मला भेटावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केले. मोपा येथील टॅक्सी व्यावसायिकांनी २२ ऑगस्टपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून टॅक्सी व्यावसायिकांचे २५ सदस्यांचे शिष्टमंडळ २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी गेले होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ पेडणे येथील टॅक्सी व्यवसाय करणारे आणि त्यांचे १० सदस्य यांना भेटण्यास इच्छुक असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले. यामुळे टॅक्सी व्यावसायिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता माघारी परतले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारने टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न वेळोवेळी सोडवले आहेत. अनुज्ञप्ती (परवाना) नूतनीकरणसाठी शुल्क भरण्यासंबंधीची अडचण दूर करणे, विमानतळावर टॅक्सी व्यावसायिकांसाठी स्टँड अधिसूचित करणे, मोपासाठी ‘ब्ल्यू कॅब’ देणे आदी आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केलेल्या आहेत, तरीही काही जण टॅक्सी व्यावसायिकांना सरकारच्या विरोधात भडकावत आहेत.’’
पेडणे येथे दुसर्या दिवशीही टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन चालूच
पेडणे – पेडणे येथील टॅक्सी व्यावसायिकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक न झाल्याने, तसेच प्रश्न सोडवण्यात न आल्याने २३ ऑगस्ट या दुसर्या दिवशीही आंदोलन चालूच ठेवले. या आंदोलनाला काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, मगोप आदी पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.