गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणार ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक
पणजी, २३ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी योजना आखली आहे. या अंतर्गत मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांना ओळखून त्यांचे स्रोत आणि जाळे शोधून काढून ते उद्ध्वस्त केले जाणार आहे. या व्यवसायाचा आर्थिक कणाही नष्ट केला जाणार आहे, अशी माहिती गोव्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.
पोलीस ठाण्यात पोलीस मद्यप्राशन किंवा अमली पदार्थाचे सेवन करतात, असे म्हणणे चुकीचे
पोलीस महासंचालक अलोक कुमार पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक कार्यालयातून २ जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांसाठी एका अधिसूचना काढण्यात आली होती. यामध्ये पोलीस ठाण्यांमध्ये मद्यपी किंवा अमली पदार्थ यांचे सेवन करणार्या पोलिसांची अचानकपणे तपासणी करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांना करण्यात आले होते. एक ईमेल प्राप्त झाला होता, त्या आधारावर ही अधिसूचना काढण्यात आली; मात्र वास्तविक सखोल माहिती गोळा करून सत्यासत्यता पडताळून ही अधिसूचना काढायला पाहिजे होती. ही गोवा पोलिसांची चूक आहे, हे मी मान्य करतो. गोवा पोलिसांचे नाव सर्वत्र चांगले आहे.’’
गोव्यात अमली पदार्थांच्या पुरवठ्यासाठी आता आंतरराज्य बसगाड्यांचा वापर
पणजी – गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आता रेल्वेबरोबरच आंतरराज्य बसगाड्यांचा वापर केला जात आहे. देशी आणि विदेशी नागरिक औषधांच्या नावावरून गोळ्यांसारख्या आकारात अमली पदार्थ बंद करून त्याचा व्यवसाय करत आहेत. अमली पदार्थविरोधी पथक आणि उत्तर गोवा पोलीस यांनी हल्लीच म्हापसा बसस्थानकावरून युगांडा देशातील २ नागरिकांना २० लाख रुपये किमतीचे कोकेन बागळल्याने कह्यात घेतले होते. या वेळी संशयित विदेशी नागरिक पुणे येथून गोव्यात बसने आले होते. अशाच प्रकारे अन्य एका प्रकरणात बेंगळुरू येथून बसने गोव्यात आलेल्या नायजेरियाच्या नागरिकाला पोलिसांनी कह्यात घेतले होते. गोव्यात अमली पदार्थाचा पुरवठा हिमाचल प्रदेश किंवा विदेशातील कुप्रसिद्ध जागांतून होण्याऐवजी देशातील महानगरांमधून होऊ लागला आहे. पोलीस अमली पदार्थांच्या स्रोताच्या शोधात आहेत.
राज्यात ७ मासांत ६ कोटी ३६ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात
पणजी – पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांनी १ जानेवारी ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत राज्यात ६ कोटी ३६ लाख रुपये किमतीचे एकूण १५८ किलो अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. या कालावधीत अमली पदार्थांच्या विरोधात ७९ प्रकरणांची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत २ कोटी ५० लाख रुपये किमतीचे ११० किलो अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले होते आणि एकूण ८९ प्रकरणे नोंद झाली होती.