माणगांव येथे श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा जयंती उत्सव भावपूर्णरित्या साजरा
कुडाळ – तालुक्यातील श्री क्षेत्र माणगांव येथे श्री प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचा जयंती उत्सव २३ ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त १७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत ऋग्वेद संहिता पारायण करण्यात आले. २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी श्री दत्तमंदिरात अभिषेक पूजा, महापूजा, त्यानंतर श्री दत्तदिंडी काढण्यात आली. भक्तीसंगीत, नाट्यसंगीत, दुपारी महानैवेद्य आणि आरती, त्यानंतर महाप्रसाद, संध्याकाळी आरती, कीर्तन आणि रात्री ९ वाजता महाप्रसाद, असे कार्यक्रम झाले. श्रींच्या जन्मस्थानी सकाळी नामस्मरण, दुपारी महानैवेद्य आणि आरती, दुपारी पुराणवाचन, नंतर श्रींच्या जन्मोत्सवाचे कीर्तन, सायंकाळी श्रींचा जन्मोत्सव, सुंठवडा प्रसाद, सायंकाळी आरती झाल्यानंतर नामस्मरणास प्रारंभ करण्यात आला. श्री प.प. वामनानंद सरस्वती स्वामी महाराज, वाराणसी आणि श्री प.प. वल्लभानंद सरस्वती स्वामी महाराज, गाणगापूर या यतींची या उत्सवाला उपस्थिती लाभली होती. सध्या चातुर्मासानिमित्त श्रीक्षेत्र माणगांव येथे हे यती वास्तव्यास आहेत. नृसिंहवाडी येथील भक्तांनी श्रींचे जन्मस्थान आणि श्री दत्तमंदिर यांची आकर्षक सजावट केली होती, तसेच कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
२४ ऑगस्ट या दिवशी श्री दत्तमंदिरात सकाळी अभिषेक पूजा, लघुरुद्राभिषेक, महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद, असे कार्यक्रम होणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तमंदिर माणगांव न्यासाने केले आहे.