वैज्ञानिक स्वरूपामुळे भारतीय संस्कृतीचे पाश्चात्त्य देशांमध्ये आकर्षण ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती
भिलवाडा (राजस्थान) येथे हरिसेवा संस्कृत शिक्षक प्रशिक्षण विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
भिलवाडा (राजस्थान) – भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्येही तिचे आकर्षण वाढत आहे. भारतावर राज्य
करण्यासाठी इंग्रजांनी भारतियांना गुरुकुल शिक्षणपद्धत आणि भारतीय धर्मग्रंथ यांपासून लांब नेले. इंग्रजी शिक्षणपद्धतीच्या प्रभावामुळे आपण आपल्या मौल्यवान ज्ञानाकडे पाठ फिरवली; पण आज पाश्चात्त्य देश त्यावर संशोधन करून भारतीय संस्कृती स्वीकारत आहेत. त्यामुळे ऋषिमुनींनी सांगितलेल्या गोष्टींचे वैज्ञानिक तथ्य समजून घेऊन त्यांना जीवनात कार्यवाहीत आणणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी येथील ‘हरिसेवा संस्कृत शिक्षक प्रशिक्षण विद्यालया’तील विद्यार्थ्यांना संबोधित करतांना काढले. या वेळी व्यासपिठावर शाळेचे मुख्याध्यापक कैलाश तिवारी, संस्थेचे सचिव ईश्वरलाल असनानी आणि ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहनलाल शर्मा उपस्थित होते. महामंडलेश्वर स्वामी हंसारामजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने या कार्यक्रमाचे आयोजन झाले. या वेळी १०० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य तिवारी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती करत असलेले हे वैज्ञानिक कार्य आहे. या कार्याची सध्या आवश्यकता आहे.’’