ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी लिहिलेल्या सूक्ष्म ज्ञानाच्या धारिकांचे संकलन केल्यामुळे होणारे आध्यात्मिक लाभ !
‘माझे शिक्षण हिंदी भाषेत झाल्यामुळे मला मराठी भाषेतील व्याकरणाचे ज्ञान नाही. मला सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान मी टंकलेखन करून दिल्यावर संकलनाशी संबंधित सेवा करणारे साधक त्या ज्ञानाची व्याकरणदृष्ट्या शुद्धी करतात. ही सेवा स्थुलातील वाटत असली, तरी त्याचे पुढील आध्यात्मिक लाभ माझ्या लक्षात येतात.
१. ज्ञान मिळवतांना चांगले शब्द किंवा मथळे न सुचण्याची खंत वाटणे आणि संकलनाशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी धारिकेचे संकलन केल्यानंतर खंत वाटणे न्यून होणे
मी ज्ञानाचे टंकलेखन करणे चालू केल्यावर सूक्ष्म ज्ञानाचा प्रवाह पुष्कळ गतीने येतो. त्यामुळे मला ‘मिळत असलेले ज्ञान क्रमबद्ध लिहिणे, आवश्यक तेथे सारणी करून आणि सोप्या स्वरूपात लिहिणे’, हे मला एक मोठे आव्हान असते. ‘समष्टीसाठी उपयुक्त आणि एखादे महत्त्वाचे सूत्र लिहितांना चांगले शब्द किंवा मथळे द्यावेत’, असे मला वाटते; पण अनेक वेळा पुष्कळ प्रयत्न करूनही मला त्या वेळी तसे शब्द, वाक्यरचना किंवा मथळे सुचत नाहीत. त्यामुळे पूर्वी संतांना धारिका पडताळायला देतांना मला ‘एखादे सूत्र चांगल्या प्रकारे लिहिता आले नाही’, अशी खंत वाटत असे. संकलनाशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी माझ्या धारिकेचे संकलन केल्यानंतर मला वाटणारी खंत न्यून झाली.
२. संकलन करणार्या साधिकेने लिखाणात केलेले पालट वाचून भाव जागृत होणे
अनेक वेळा संकलनाशी संबंधित सेवा करणारे साधक वाक्यरचना किंवा शब्द यांत पालट करून एवढे चांगले संकलन करतात की, मला पडताळून मिळालेल्या धारिकेतील लिखाण वाचतांना माझा भाव जागृत होतो. त्यांनी संकलन केलेली धारिका वाचतांना काही वेळा ‘एखादे सूत्र मी लिहिले आहे’, यावर माझा विश्वासच बसत नाही. ‘साधकांनी धारिकेचे संकलन करतांना त्यात केलेल्या पालटामुळे त्या ज्ञानातील देवत्व किंवा आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते आणि ‘जणू त्यांनी सूक्ष्म ज्ञानाद्वारे ते संकलन केले आहे’, असे मला जाणवते, उदा. भक्तीसत्संगाच्या संदर्भात मी लिहिलेल्या सूक्ष्म परीक्षणाचा मथळा मला सुचत नव्हता. त्यामुळे मी ‘सनातनच्या भक्तीसत्संगांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !’ असा साधारण मथळा दिला होता. त्याच लेखाला कु. दीपाली होनप यांनी ‘साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मविश्वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेल्या भक्तीसत्संगरूपी ‘भक्तीगंगे’चे माहात्म्य जाणा आणि साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !’ असा मथळा दिला. त्यामुळे केवळ लेखाचा मथळा वाचूनच भाव जागृत होतो.
३. संकलनाशी संबंधित सेवा करणार्या साधिकांच्या तळमळीमुळे ज्ञान सोप्या भाषेत लिहिण्यास साहाय्य होणे
सुश्री (कु.) दीपाली होनप आणि सौ. छाया नाफडे या साधिका माझ्या धारिकांचे संकलन करतात. पूर्वी कै. (श्रीमती) अदिती देवल (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६६ वर्षे) याही संकलन करायच्या. संकलन करतांना त्यांना अडचण आली किंवा एखादे सूत्र समजले नाही, तर त्या सूत्राच्या संदर्भात त्या मला विचारतात. मला सूत्र विचारतांनाही त्यांची शिकण्याची वृत्ती असते. साधिकांच्या या तळमळीमुळे मला ‘ज्ञान सोप्या भाषेत लिहायला हवे’, हे समजण्यास साहाय्य झाले आणि अजूनही होत आहे. पूर्वी मी थेट पडताळायला ठेवत असलेल्या धारिकांमधील ज्ञानातील सूत्र लगेच कळत नसल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘ज्ञानाचे लिखाण सोपे करणे’, अशी टीप लिहून ज्ञान सोप्या भाषेत लिहिण्यासाठी धारिका मला द्यावी लागत असे. संकलन-सेवा करणार्या साधिकांमुळे माझ्याकडून समजायला कठीण अशा भाषेत ज्ञान लिहिण्याची चूक ७० ते ८० टक्के इतक्या प्रमाणात अल्प झाली, तसेच माझ्या ज्ञानाची भाषाही सोपी झाली. अनेक वेळा जे सूत्र किंवा परिच्छेद या संदर्भात मी समाधानी नसतो, त्याच सूत्रांच्या संदर्भात संकलनाची सेवा करणार्या साधकांनी विचारल्यावर मला त्यात करायचे योग्य पालट सुचतात. या संदर्भात मला जाणवले, ‘ज्ञानाचे टंकलेखन करतांना माझ्यात तेवढी तळमळ नसते. याउलट संकलनाची सेवा सेवा करणारे साधक एवढ्या तळमळीने विचारतात की, त्यांच्या तळमळीमुळे त्या वेळी देव मला तेच ज्ञान सोपे करून सांगतो.’
४. साधकांनी संकलनाची सेवा कृतज्ञताभावाने करणे
संकलनाची सेवा करणारे साधक माझ्या ज्ञानाच्या धारिकांचे संकलन करण्याची सेवा पुष्कळ कृतज्ञताभावात राहून करतात. एखाद्या धारिकेवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘लिखाण आवडले’, अशी टीप लिहिल्यावर माझ्याहून अधिक आनंद त्या धारिकेचे संकलन करणार्या साधकाला होतो. अनेक वेळा मी गमतीत त्यांना म्हणतो, ‘‘सर्व ज्ञान देव देतो आणि तुम्ही कष्ट घेऊन त्या ज्ञानाचे संकलन करतात. गुरुदेवांना लिखाण आवडल्यावर खाऊ मात्र मला मिळतो.’’ त्या वेळी सर्वच साधक ‘गुरुदेवांसाठी सेवा करायला मिळाली आणि सेवेतून आनंद मिळाला’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
संकलनाशी संबंधित सेवा करणार्या साधकांकडून मिळत असलेल्या अनमोल साहाय्यासाठी मी त्या सर्व साधकांप्रती कृतज्ञ आहे.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४, दुपारी ३.३० ते ४.०१ वाजेपर्यंत)
|