खड्डे चुकवा, परवाना मिळवा !
एका सामाजिक माध्यमावर नुकतेच एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘खड्डे चुकवा, परवाना मिळवा !’ ‘आर्.टी.ओ.’, म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार ‘इंग्रजी आठ’ आकड्याप्रमाणे दुचाकी चालवता आल्यास परवाना दिला जातो; पण आता सध्याच्या स्थितीनुसार कार्यालयाने त्यांचे नियम पालटून वास्तववादी विचार करायला हवा. आठ आकड्याच्या ऐवजी शिकाऊ वाहनचालकाला पुढील अडथळ्यांतून वाहन चालवायला द्यावे, उदा. १० ते १२ छोटे खड्डे, ६ – ७ मोठे खड्डे, एखादा मोठा मंडप, मध्येच येऊन ‘यू टर्न’ घेणारे रिक्शावाले, ४ – ५ कुत्री यांतून जो सुरक्षितरित्या गाडी चालवून विशिष्ट अंतर पार करील, त्यालाच परवाना द्यावा.’ या लिखाणाला अनेकांनी समर्थन दर्शवले; कारण प्रत्यक्षातही इंग्रजी आठ आकड्यावरून वाहन चालवण्यापेक्षा सध्याच्या काळात वरील स्वरूपाची अडथळ्यांची शर्यत अनेकदा पार करावी लागते. खड्ड्यांमध्ये पडून काही वेळा चालक घायाळ होतात, तर खड्डा चुकवता न आल्याने किंवा खड्ड्यात पडून काहींचा मृत्यूही ओढवतो. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
अशा घटना प्रतिदिन ५- ६ घटना असतात; पण त्यावर आतापर्यंत कुणालाच नियंत्रण मिळवता आलेले नाही. जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत अपघात होतच रहाणार आहेत. ‘आता खड्डे कधी बुजवले जातील ?’, हा सध्याच्या स्थितीत यक्षप्रश्नच आहे. याचे उत्तर कुणाकडेच नाही. त्यामुळे वाहनचालकांनीच आता शहाणे व्हायला हवे. खड्ड्यांच्या दृष्टीने आपण अधिक सतर्क रहायला हवे. कुत्रे-मांजर हे प्राणीसुद्धा मध्येच आडवे आल्याने काहींची गाडीवरील पकड सैल होऊन गाडी कुठेतरी ठोकली जाते. या सर्व अडथळ्यांतून सुखरूपरित्या मार्ग कसा काढावा ? वाहनाला हानी न पोचता खड्डे कसे पार करावेत ? याचे प्रशिक्षण देण्याची वेळ आता आली आहे. सध्या हे प्रशिक्षण दिले जात नसल्याने नाहक प्राण गमावावा लागतो.
सध्या वाहनांची वाढती गर्दी पहाता वाहनचालक त्यादृष्टीनेही प्रशिक्षित आणि सतर्क असायला हवा. हे दायित्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नव्हे का ? आठ आकड्याप्रमाणे वाहन चालवता यायलाच हवे, त्याविषयी वाद नाही. याआधी वाहनसंख्या मर्यादित आणि अपघातांचे तुलनेत अल्प प्रमाण असतांना सर्व ठीक होते; पण आता वाहनेही वाढत असल्याने त्यात काळानुसार पालट करणे अत्यावश्यक ठरते. ‘एकदा का परवाना हातात आला की, गाड्या कसेही चालवायला आपण मोकळे’, अशी तरुणांची अयोग्य मानसिकता झालेली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काळानुसार पालटणे अत्यावश्यक आहे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.