प्रेमळ आणि संतांप्रती अपार भाव असणार्या सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे (वय ७६ वर्षे) !
‘पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या आई आहेत. श्रावण कृष्ण पंचमी (२४.८.२०२४) या दिवशी पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या (व्यष्टी) संत) यांचा ७६ वा वाढदिवस आहे. ‘मार्च २०२४ या मासापासून मला पू. शैलजा परांजपेआजी यांचा सहवास लाभला. पू. आजी संकलनासाठी येणार्या धारिकांचे टंकलेखन आणि प्राथमिक टप्प्याचे संकलन करतात. पू. आजी ज्या खोलीत सेवेला बसतात, त्याच खोलीत बसून मीही टंकलेखनाची सेवा करते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या चरणी ७६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. साधकांची अत्यंत आत्मीयतेने विचारपूस करून सर्वांना आनंद देणार्या पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी !
‘पू. शैलजा परांजपेआजी या प्रेमळ आहेत. त्या आश्रमातील प्रत्येक साधकाची अत्यंत आत्मीयतेने विचारपूस करतात. त्या शाळेतील मुले, युवा आणि वयस्कर साधकांना सारखेच प्रेम देतात. त्यामुळे सर्वांनाच पुष्कळ आनंद होतो.
२. साधकांच्या मनावर प्रार्थनेचे महत्त्व सहजतेने बिंबवणार्या पू. (सौ.) परांजपेआजी !
पू. आजी साधकांना नामजपादी उपायांचा लाभ होण्यासाठी साधकांच्या समवेत बसून नामजप करतात. एक दिवस काही कारणामुळे पू. आजींच्या नामजपाच्या वेळेत पालट झाला. त्यांना दुपारी १ ते २ या वेळेत साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यासाठी बसायचे होते. त्यांनी उपायांना प्रारंभ करण्यापूर्वी साधकांना सांगितले, ‘‘दुपारची वेळ आहे. मला झोप आली, तर कुणीतरी उठवा. मी डोळे मिटून बसले, तर माझा डोळा लागण्याची शक्यता आहे.’’ प्रत्यक्षात पू. आजींना जराही झोप आली नाही.
नामजपादी उपाय झाल्यावर पू. आजींनी प्रथम कृतज्ञता व्यक्त केली आणि त्या साधकांना म्हणाल्या, ‘‘मी जपमाळेतील प्रत्येक मण्यानंतर प्रार्थना करत होते. ‘देवा, मला झोप येऊ देऊ नकोस.’’ यावरून त्यांनी ‘साधकांच्या मनावर प्रार्थनेचे महत्त्व सहजतेने बिंबवले’, असे माझ्या लक्षात आले.
३. संताप्रती भाव
पू. आजींना सर्वच संतांप्रती आदर आहे. पू. आजींची मुलगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे त्यांचे जावई आहेत, तरीही पू. आजी त्यांचा उल्लेख करतांना अनुक्रमे ‘श्रीचित्शक्ति आणि सद्गुरु काका’ असे आदराने म्हणतात. यातूनच पू. आजींचा संतांप्रतीचा अपार भाव दिसून येतो.
४. पू. आजी आश्रमात आल्यावर एक वेगळाच सुगंध सर्वांना जाणवतो.
पू. शैलजा परांजपेआजींचे गुण आम्हा सर्व साधकांना आत्मसात करता येऊ देत आणि त्यांच्या सहवासाचा आम्हा सर्व साधकांना लाभ करून घेता येऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. परांजपेआजी यांच्या चरणी प्रार्थना !’
– रजनी नगरकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |