सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व !
१. बाहेरगावी असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तींच्या घरातील त्रासाविषयी साधिकेला पूर्वकल्पना नसणे, तेथे गेल्यावर पू. वामन राजंदेकर यांना सर्वत्र काळे (त्रासदायक) आवरण दिसणे आणि त्यांनी त्या घरात न रहाण्याविषयी सांगणे; मात्र काही कारणास्तव त्यांना आणि साधिकेच्या कुटुंबियांना त्या घरात रहावे लागणे
‘जुलै २०२३ मध्ये आम्ही बाहेरगावी एका ओळखीच्या व्यक्तींच्या घरी रहायला गेलो होतो. त्यांच्या घरी गेल्यावर काही वेळातच पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) यांनी मला सांगितले, ‘‘आई, यांच्या या घरात सगळीकडे काळंच काळ (वाईट शक्ती) आहे. यांच्या घरात नारायण कुठेच नाहीत. घरातील लादीवर आणि वर पंख्याजवळ सगळीकडे केवळ वाईट शक्तीच आहेत. येथे काहीच चांगले नाही. आपण यांच्याकडे थांबायला नको. आपण दुसरीकडे जाऊया’’; मात्र काही कारणाने आम्हाला त्यांच्या घरून लगेच निघता येणार नव्हते. आम्हाला आणखी २ – ३ दिवस त्यांच्याकडे रहावे लागले. आम्ही त्यांच्या त्या घरी प्रथमच गेलो असल्याने आम्हाला त्यांच्या वास्तूमधील त्रासाविषयी काहीच पूर्वकल्पना नव्हती.
२. त्या वास्तूमध्ये रहात असतांना पू. वामन यांनी त्यांच्या दैनंदिन कृतींमध्ये पालट करणे
आम्ही त्यांच्या घरी आणखी २ – ३ दिवस रहायला होतो. त्या वेळी पू. वामन यांनी त्यांच्या दैनंदिन कृतींमध्ये स्वतःहून काही पालट केले. त्यांचे वागणे, बोलणे, खेळणे, खाणे, अशा सर्वच स्तरांवर पालट जाणवत होता.
२ अ. ‘त्या वास्तूतील प्रसाधनगृहात मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती आहेत’, असे सांगून पू. वामन यांनी एकही दिवस अंघोळ न करणे
पू. वामन यांनी मला सांगितले, ‘‘या वास्तूतील प्रसाधनगृहात मोठ्या प्रमाणात वाईट शक्ती आहेत. तेथे अंघोळ केल्यास देहावर पुष्कळ आवरण येणार आहे.’’ आम्ही त्यांच्या घरी रहात असतांना पू. वामन यांनी एकही दिवस अंघोळ केली नाही. ते अत्यावश्यक असतांनाच प्रसाधनगृहात जात असत. ते प्रसाधनगृहातून बाहेर आल्यावर लगेच कापराचे उपाय करत असत. (आम्हाला त्यांच्या प्रसाधनगृहात गेल्यावर भीतीदायक वाटत होते. आम्हाला तेथे सर्वत्र काळे दिसून दिव्याचा प्रकाशही अल्प असल्यासारखा वाटत होता. आम्हाला अंघोळ करून आल्यावर अधिक अस्वच्छ वाटत असे. आम्हाला तेथील पाण्याचा स्पर्श जाणवत नव्हता.)
२ आ. पू. वामन शक्य तितके अल्प प्रमाणात अन्न ग्रहण करत होते. पू. वामन यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून दिले, तरीही त्यांनी ते खाल्ले नाही.
२ इ. पू. वामन यांना रात्री झोप न येणे आणि त्यांनी भ्रमणभाषवर रात्रभर नामजप लावून ठेवायला सांगणे
आम्ही तेथे असतांना त्यांना रात्री झोप येत नव्हती. रात्री खोलीतील दिवे बंद केल्यावर त्यांना वेगवेगळे आवाज ऐकू येत असत. त्यांनी मला भ्रमणभाषवर रात्रभर नामजप लावून ठेवायला सांगितला. पू. वामन यांनी मला सांगितले, ‘‘खिडकीजवळ एक स्त्री रूपातील वाईट शक्ती आहे. येथे सूक्ष्मातील युद्ध चालू आहे. आपण पुन्हा येथे यायला नको, नाहीतर आपल्यावरही पुष्कळ आवरण येईल.’’ पू. वामन काही मुद्रा करत आणि भ्रमणभाषवर ‘महाशून्य’ हा नामजप लावायला सांगत.
३. तिसर्या दिवशी पू. वामन यांची प्रकृती बिघडणे आणि त्यांनी ‘आपण यांच्या घरातून निघूया, येथे अन्नपदार्थ, तसेच औषधे यांच्यावरही आवरण आले आहे’, असे सांगणे
आम्ही त्यांच्याकडे रहायला गेल्याच्या तिसर्या दिवशी पू. वामन यांची प्रकृती थोडी बिघडली. त्यांना सर्दी झाली आणि ताप आला. मी त्यांना औषध दिले आणि त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करणे चालू केले. त्या वेळी पू. वामन यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘‘आपण यांच्या घरातून निघूया. येथे केवळ अन्नपदार्थांवरच नाही, तर औषधांवरही त्रासदायक शक्तीचे आवरण आले आहे. आपण आपल्या घरी जाऊया.’’ पू. वामन यांनी सांगितल्यानुसार आम्ही लगेचच गोव्याला येण्यासाठी निघालो.
४. पू. वामन यांनी त्या कुटुंबातील व्यक्तीला त्या वास्तूतील त्रासाविषयी स्पष्टपणे; पण नम्रतेने आणि शांतपणे सांगणे
त्या कुटुंबातील एका व्यक्तीने पू. वामन यांना विचारले, ‘‘तुम्हाला आमच्या या नवीन घरी कसे वाटते ? हे घर किती मोठे आणि छान आहे, बघा !’’ तेव्हा पू. वामन यांनी त्यांना घरातील त्रासाविषयी स्पष्टपणे; पण अतिशय नम्रतेने आणि शांतपणे सांगितले. पू. वामन यांची ‘त्या व्यक्तीने माझे (पू. वामन यांचे) म्हणणे ऐकावे’, अशी कोणतीच अपेक्षा नव्हती. त्या वेळी मला संतांमधील निरपेक्षभावाची जाणीव झाली.
५. पू. वामन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार साधना करण्याचे महत्त्व लक्षात आणून देणे
मी पू. वामन यांना त्या कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या आजारपणाविषयी सांगितले. त्यावर पू. वामन म्हणाले, ‘‘हो. असेच होणार होते. त्यांनी नारायणांचे ऐकले नाही ना ! आपण नारायणांचे (पू. वामन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘नारायण’ असे संबोधतात.) ऐकले नाही, साधना केली नाही की, वाईट शक्ती अशाच त्रास देणार. त्या कुटुंबियांनी त्यांचे स्वत:चे घर सोडून भाड्याच्या घरात रहायला नको होते. त्यांनी दुसर्या ठिकाणी रहायचे असल्यास ‘वास्तूमध्ये काही त्रास तर नाही ना !’, हे तरी पहावे आणि हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला साधनाच करायला हवी, तरच नारायणांनी सांगितलेले आपल्याला समजते.’’
६. पू. वामन यांनी ‘त्या वास्तूत रहात असलेल्या व्यक्तींनीही त्या वास्तूत राहू नये’, असे सांगणे
आम्ही प्रवासात असतांना पू. वामन यांनी सांगितले, ‘‘आपण ज्यांच्या घरी गेलो होतो, त्यांनीही तेथे रहायला नको. तेथे केवळ वाईट शक्ती आहेत. वाईट शक्ती त्यांना पुष्कळ त्रास देतील. त्या कुटुंबियांनी साधना पुष्कळ वाढवायला हवी. त्यांनी नारायणांप्रती भाव वाढवायला हवा. त्या वास्तूत रहाणार्या व्यक्ती साधना नीट करत नाहीत; म्हणून त्यांना त्या घरात चांगले वाटते. त्या घरातील सदस्यांना काहीच त्रास जाणवत नाही किंवा अयोग्य वाटत नाही. त्यांनी त्यांच्या आधीच्या घरी रहायला जावे. तेथे आध्यात्मिक त्रास थोडा अल्प आहे.’’
७. त्या वास्तूत रहाणार्या कुटुंबातील व्यक्तींना झालेले विविध त्रास
अ. काही दिवसांनी आम्हाला ‘त्या घरातील व्यक्तींचे एकमेकांशी होत असलेल्या वादाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे’, असे समजले.
आ. घरातील व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आजारपणात वाढ झाली.
इ. घरात प्रतिदिन काही ना काही उपकरण, नळ, गिझर इत्यादी नादुरुस्त होत होते. त्यावर त्यांचे पुष्कळ पैसे व्यय होत होते. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होत होता.
ई. त्या कुटुंबातील वयस्कर व्यक्तींना पुष्कळ शारीरिक त्रास होऊन त्यांचे शस्त्रकर्म करावे लागले. या कालावधीत त्यांना पुष्कळ आर्थिक, शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागला.
उ. त्या कुटुंबातील एका नोकरी करणार्या व्यक्तीला नोकरी आणि व्यवसाय यांच्या ठिकाणी बर्याच आर्थिक अन् अन्य अडचणी आल्या.
८. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्या कुटुंबातील व्यक्तींना नामजपादी उपाय सांगणे
त्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास होऊ लागल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांना नामजपादी उपाय सांगितले. त्या वेळी सद्गुरु गाडगीळकाकांनी विचारले, ‘‘त्या कुटुंबाने त्यांचे आधीचे घर का पालटले ? आता ते रहात असलेल्या वास्तूत पुष्कळ आध्यात्मिक त्रास आहे. पू. वामन यांनी सांगितले होते ना, या वास्तूत रहायला नको. त्या कुटुंबांतील व्यक्तींनी पू. वामन यांचे ऐकायला हवे होते. संत कोणतीच गोष्ट अनावश्यक सांगत नाहीत.’’
९. संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व
अ. यातून संतांचे आज्ञापालन करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. ‘संतांनी आपल्याला एखादे सूत्र सांगितल्यास आपण संपूर्ण श्रद्धा ठेवून ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. संतांचे वय, त्यांचे आपल्याशी असलेले व्यावहारिक नाते इत्यादी गोष्टींकडे न बघता त्यांच्याकडे ‘ईश्वराचे सगुण रूप’ असे म्हणून भाव ठेवून विचार आणि कृती करावी. असे न केल्यास कालांतराने आपल्यालाच त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात आणि त्यात आपली अनावश्यक ऊर्जा व्यय होते’, असे माझ्या लक्षात आले.
आ. देवानेच पू. वामन यांच्या माध्यमातून त्या कुटुंबियांना त्या वास्तूतील त्रासाची जाणीव करून दिली होती, तसेच योग्य कृती करण्याविषयी सुचवले होते; परंतु त्या कुटुंबियांनी पू. वामन यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. ते त्याच वास्तूमध्ये रहात आहेत. पू. वामन यांना याविषयी समजल्यावर त्यांनी आम्हाला त्या कुटुंबियांच्या घरी न जाण्याविषयी स्पष्टपणे सांगितले, ‘‘जे नारायणांचे आज्ञापालन करत नाहीत किंवा साधना ठाऊक असून ती योग्य प्रकारे करत नाहीत, त्यांच्याकडे जायला नको.’’
इ. नंतर आमच्या लक्षात आले, ‘पू. वामन यांनी असे सांगितल्यानंतर आपोआपच अशी परिस्थिती निर्माण झाली की, आम्हाला पुन्हा त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंगच आला नाही.’ ‘संतांनी सांगितल्याप्रमाणे ईश्वर प्रत्यक्षातही तशी परिस्थिती निर्माण करतो’, हे आम्हाला शिकायला आणि अनुभवायला मिळाले.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
प.पू. गुरुदेव, केवळ आपल्याच कृपेने आम्हाला पू. वामन यांना अनुभवण्याची संधी मिळत आहे. ‘संतांची प्रत्येक कृती ईश्वरेच्छेनेच घडत असते’, हे सतत जाणवते. ‘संतांना वयाचे बंधन नसते’, हे पुन्हा एकदा आम्हाला अनुभवायला मिळाले. ‘ईश्वराच्या या सगुण रूपाला अनुभवणे, त्यांच्या समवेत सतत रहाणे आणि त्यांचा प्रत्येक विचार अन् कृती यांचा अर्थ समजून घेणे’, हे आमच्या क्षमतेपलीकडचे आहे. गुरुदेवा, केवळ आपली कृपा आणि शिकवण यांमुळे पू. वामन यांना समजून घेणे आम्हाला शक्य होत आहे. प.पू. गुरुदेव, आपण नेहमी सांगता, ‘‘शिकण्यातच अधिक आनंद आहे.’’ या सूत्राची आम्हाला सतत आठवण होते. पू. वामन यांच्याकडून साधनेचे मूळ तत्त्व प्रत्यक्ष प्रसंगातून शिकण्यात आम्हाला आनंद मिळत आहे. ‘या कठीण काळात आणि येणार्या काळातही मला असे शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे अन् शिकण्यातील आनंद अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी कृतज्ञताभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर, फोंडा, गोवा. (२२.४.२०२४)
|