Nepal Bus Accident : महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून १४ जण ठार
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – नेपाळच्या तनहून जिल्ह्यात उत्तरप्रदेशातील बस नदीमध्ये पडल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन नेपाळच्या पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. बसचालकाने नियंत्रण गमावल्यावर बस नदीत पडली. सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोचले आहेत. ही बस गोरखपूरच्या केसरवाणी परिवहनची होती. ती पांडुरंग यात्रेला निघाली होती. २ बसमधून महाराष्ट्रातील ११० लोक प्रवास करत होते. हे सर्व जण उत्तरप्रदेशमार्गे नेपाळच्या यात्रेला गेले होते. यांतील एका बसला अपघात झाला.
बहुतांश भाविक जळगावचे ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून एक्स वर पोस्ट करून म्हटले की, प्रवाशांतील बहुतांश भाविक जळगावचे असून जळगावचे जिल्हाधिकारी उत्तरप्रदेशातील महाराजगंजच्या जिल्हाधिकार्यांच्या संपर्कात आहेत. मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही समन्वय साधण्याची सूचना देण्यात आली असून स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हेसुद्धा सातत्याने संपर्कात आहेत.
नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते… https://t.co/dnBWB8goKx— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2024