छत्रपती संभाजीनगर येथे विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित !
पार्सल विलंबाने आणले म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यास अमानुष मारहाण !
छत्रपती संभाजीनगर – ‘ऑनलाईन’ मागवलेले पार्सल पाऊस चालू असल्याने देण्यास २ घंटे विलंब केल्याच्या कारणावरून वृत्तपत्र विक्रेता आणि ‘डिलिव्हरी’ करणारा मुलगा जितेंद्र मानके (वय ३० वर्षे) यांना काठीने अमानुषपणे मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचारी जीवन शेजवळ यांना निलंबित केले आहे, तसेच शेजवळ यांच्यावर गुन्हाही नोंद केला आहे. (असे क्रूर पोलीस खात्यात रहाण्यास लायक आहेत का ? त्यांच्यावर बडतर्फीसारखी कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक) ही घटना १९ ऑगस्ट या दिवशी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आविष्कार कॉलनी येथे घडली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा निषेध !
‘वृत्तपत्र विक्रेते जितेंद्र मानके यांच्यासमवेत घडलेली घटना निंदनीय आणि क्लेशदायक आहे. पोलीस शेजवळ यांच्यावर कठोर करावी,’, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नीलेश फाटके यांनी केली. ‘सज्जन नागरिकांना असा अनुभव येत असेल, तर लोकांनी कुणाकडे न्याय मागावा ?’, असा प्रश्न विक्रेते भाऊसाहेब घुगे यांनी उपस्थित केला. |
तक्रारदार जितेंद्र मानके हे वर्तमानपत्र वाटपासमवेत ‘ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी’चे काम करतात. त्या दिवशी त्यांना ई-कॉम एक्सप्रेस कार्यालयातून ८३ पार्सल वाटप करण्यासाठी दिले होते. ते पार्सल घेऊन निघाले असतांना आरोपी पोलीस जीवन शेजवळ याचा दूरभाष आला. त्या वेळी ‘आताच पार्सल वाटप करणे चालू केले आहे. पाऊस असल्याने थोड्या वेळात तुमचे पार्सल आणून देतो’, असे जितेंद्र यांनी सांगितले. जितेंद्र यांनी पार्सल आणल्यानंतर शेजवळ यांनी त्यांना जवळ बोलावून काठीने अमानुष मारहाण केल्यामुळे ते चक्कर येऊन पडले. तेथील नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले.
संपादकीय भूमिका :अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? |