नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील सौ. सीमंतिनी बोर्डे यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट !
सनातन संस्थेने सांगितल्याप्रमाणे साधना करू लागल्यापासून नेवासा, अहिल्यानगर येथील साधिका सौ. सीमंतिनी बोर्डे (वय ५८ वर्षे) यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. ‘मला शास्त्रीय संगीताचे चांगलेच ज्ञान आहे आणि मी पेटी चांगली वाजवते’, हा तीव्र अहंभाव असणे
‘मी सनातन संस्थेशी जोडण्यापूर्वी प.पू. कलावतीआईंच्या केंद्रात भजन आणि संवादिनी (हार्माेनियम) वादन सेवा यांसाठी अनेक वर्षे जात होते. प.पू. आईंची भजने गातांना किंवा पेटीवर वाजवतांना ‘त्या भजनांचे स्वर, त्यांचा चढ-उतार, त्यांतील हरकती (टीप), ते कोणत्या रागातील आहे ?, तसेच ते तालात बरोबर येते का ? टाळाचा ठोका नेमका कुठे पडला पाहिजे ?’, या गोष्टींकडेच माझे अधिक लक्ष असायचे. ‘मी चांगली पेटी वाजवते, मला शास्त्रीय संगीताचे चांगलेच ज्ञान आहे’, हा तीव्र अहंभावही माझ्यामध्ये होता.
(टीप : गायक गातांना काही शब्दांना विशिष्ट साज देण्यासाठी त्याचे विविध पद्धतींनी करत असलेल्या उच्चारणाला ‘हरकती’ असे म्हणतात.)
२. साधनेमुळे संतांच्या भजनांचा मूळ भावार्थ लक्षात येणे
मी आताही तीच सर्व भजने म्हणत असते; परंतु आता साधनेमुळे माझ्या विचारसरणीत पालट झाल्यामुळे माझे भजनांच्या अर्थाकडे लक्ष जाऊ लागले आहे. ‘प.पू. कलावतीआईंच्या त्या भजनांतून मला काय बोध घ्यायचा आहे ?’, हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे. ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची (गुरुदेवांची) माझ्यावर असलेली अपार कृपा आहे.
३. केवळ आर्त आणि शरणागतभावाने भजनातून ईश्वराची आळवणी केल्यास ते ईश्वरापर्यंत पोचत असल्याची जाणीव होणे
भजनातील आर्तता, शरणागतभाव आणि भजनातून केलेली ईश्वराची आळवणी आता अधिक प्रमाणात जाणवते. आता मला भजने म्हणतांना वेगळाच आनंद मिळू लागला आहे. ‘ईश्वराला आळवण्यासाठी पेटी, तबला, तसेच तानपुरा या कोणत्याच वाद्याची आवश्यकता नसून केवळ आर्त आणि शरणागतभावाने भजन गायले, तरी ते ईश्वरापर्यंत पोचते’, हे मला जाणवते.
४. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतील टप्प्यांनुसार साधनेस आरंभ होऊन चूक होण्यापूर्वीच लक्षात येऊ लागणे
(चूक लक्षात येण्याचे टप्पे – १. चूक झाल्यानंतर २. चूक होत असतांना आणि ३. चूक होण्यापूर्वी लक्षात येणे – संकलक)
अ. गेल्या १० वर्षांपासून मी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवत आहे; परंतु गेली १० वर्षे मी अधिकाधिक पहिल्या टप्प्यावरच होते, म्हणजेच बर्याच वेळेला चूक झाल्यानंतरच माझ्या लक्षात येत असे.
आ. आता माझे स्वभावदोष आणि अहं यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पालट झाला आहे.
इ. गेल्या एक मासापासून दुसरा आणि तिसरा टप्पाही मी गुरुकृपेने अनुभवत आहे. बर्याचदा चूक होण्यापूर्वीच लक्षात येते, म्हणजे मन सावध होते. केवढी ही गुरुदेवांची अपार कृपा !
५. ‘स्वतःमध्ये पालट करण्यासाठी तळमळ अधिक वाढवायला हवी’, हे गुरुकृपेने लक्षात येणे
माझ्या तळमळीचे प्रमाण जेवढे असेल, तेवढेच साहाय्य भगवंत करतो. ‘माझी तळमळ थोडी अधिक असेल, तर भगवंताच्या साहाय्याचे प्रमाण वाढते’, हेही मी अनुभवत आहे. अर्थात् ‘माझ्यात पुष्कळ पालट करण्यासाठी माझी तळमळ अजून अधिक वाढवायला हवी’, हेही गुरुदेवांच्या कृपेने लक्षात आले आहे.
६. प्रार्थना
गुरुदेवांच्या चरणी एकच प्रार्थना आहे, ‘आम्हा सर्वच साधकांची तळमळ तुमच्याच कृपेने वाढू दे आणि आम्हा साधकांकडून भगवंताला आनंद देता येऊ देत.’
७. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातनचे सर्व सद्गुरु आणि संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सीमंतिनी बोर्डे (वय ५८ वर्षे), नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. (पूर्वीचे नाव अहमदनगर). (१०.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |