सेवाभावी वृत्तीने आणि तळमळीने परिपूर्ण सेवा करणार्‍या केरळ येथील साधिका श्रीमती विजया कुमारी (वय ६१ वर्षे) !

श्रीमती विजया कुमारी

१. सेवेची तळमळ

१ अ. उत्साही आणि क्रियाशील : ‘श्रीमती विजया कुमारी केरळमधील एर्नाकुलम् या जिल्ह्यात रहातात. त्या अंगणवाडीत ‘शिक्षिका’ म्हणून काम करतात. त्यांचे वय ६१ वर्षे असून त्या पुष्कळ क्रियाशील आहेत. त्या घरोघरी प्रसार करणे, ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार बनवणे, मंदिरांत धर्मशिक्षण फलक लिहिणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, तसेच हिंदीमधून मल्याळम् भाषेत भाषांतर करणे या सर्व सेवा करतात. कुठलीही सेवा करण्यास त्या तत्परतेने सिद्ध असतात. त्यांची सेवेची गती तरुणांना लाजवेल, अशी आहे.

कु. आदिती सुखटणकर

१ आ. शारीरिक त्रासामुळे हात दुखत असतांनाही हिंदी भाषेतील भक्तीसत्संगांचे मल्याळम्मध्ये भाषांतर करून ते हाताने लिहून काढणार्‍या श्रीमती विजया कुमारी ! : श्रीमती विजयाताई हिंदी भाषेतील भक्तीसत्संगांचे मल्याळम् भाषेत भाषांतर करतात आणि प्रत्येक आठवड्याला स्थानिक साधकांसाठी भावसत्संग घेतात. त्यांना संगणकावर टंकलेखन करायला विशेष जमत नाही. त्यामुळे त्या भाषांतर करत भक्तीसत्संगांचे सर्व विषय हातानेच लिहून काढतात. त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासही आहेत. लिहितांना त्यांचा हात दुखतो. त्यामुळे प्रत्येक वेळी त्या सांगतात, ‘‘आता यापुढे मला असे लिहिणे जमणार नाही’’, तरीही पुढील आठवड्यात त्या तेवढ्याच उत्साहाने भक्तीसत्संगाचे भाषांतर करून लिहून काढतात. कितीही त्रास झाला, तरी सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याकडे त्यांचे लक्ष असते.

१ इ. अंगणवाडीत येणार्‍या मुलांना श्लोक आदी शिकवल्याने श्रीमती विजया कुमारी यांना इतरांच्या रोषाला बळी पडावे लागणे : त्या अंगणवाडीत येणार्‍या मुलांना श्लोक इत्यादी शिकवतात. त्यामुळे त्यांना अन्य पंथियांकडून पुष्कळ विरोध होऊ लागला. ‘ताई अंगणवाडीत हिंदुत्वाचे कार्य करतात, त्यांच्या नोंदींच्या वहीमध्ये (‘रजिस्टर’मध्ये) दैवी चिन्हे काढतात’, असे म्हणून सर्वजण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले आणि त्यांच्या विरोधात खोटे बोलू लागले. त्यामुळे त्यांना वरिष्ठांकडून पुष्कळ अडचणी येऊ लागल्या आणि पुष्कळ मानसिक दबावही आला. तेव्हा त्या ५ – ६ मास केरळ येथील सेवाकेंद्रात रहाण्यासाठी गेल्या. ‘सेवाकेंद्रात आल्यावर बरे वाटेल’, या विश्वासाने त्या तेथे राहून सेवा करू लागल्या.

१ ई. सेवाभावी वृत्ती असल्याने श्रीमती विजया कुमारी यांनी सेवाकेंद्रात (कै.) पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल यांची सेवा मनापासून करणे : विजयाताई सेवाकेंद्रात आल्या. तेव्हा पू. सौदामिनी कैमल (अम्मा) यांची प्रकृती ठीक नव्हती, तसेच तेव्हा सेवाकेंद्रात साधकसंख्या अल्प होती आणि गुरुपौर्णिमेचा प्रसारही चालू होता. अशा स्थितीत विजयाताईंना काही कारणांमुळे घरी जावे लागले, तर तेथील कामे लवकर पूर्ण करून त्या सेवाकेंद्रात परत यायच्या. अम्मांची सेवा आणि इतर साधकांना साहाय्य व्हावे, यासाठी त्या तत्परतेने परत यायच्या. विजयाताईंनी पू. अम्मांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची सेवा मनापासून केली. त्यांचे अम्मांवर सतत लक्ष असायचे. त्यांच्या हाता-पायांना औषध लावून देणे, त्यांच्याकडून जमेल तसा व्यायाम करून घेणे इत्यादी सर्व सेवा त्या करायच्या.

२. पतीच्या निधनाची वार्ता कळूनही स्थिर रहाणे

विजयाताईंच्या पतीचे एक वर्षापूर्वी निधन झाले. तेव्हा त्या सेवाकेंद्रात रहात होत्या आणि त्यांचे पती अन्य ठिकाणी रहात होते. त्यांना पतीच्या निधनाची वार्ता पहाटे कळली. त्यानंतर सेवाकेंद्रातून निघण्याआधी त्यांनी भाषांतराची एक सेवा पूर्ण करून ठेवली. एवढ्या कठीण प्रसंगातही त्यांनी स्थिर राहून सेवा पूर्ण केली.

३. परिस्थिती स्वीकारणे

विजयाताई नेहमी हसतमुख असतात. खरेतर त्यांना घरी पुष्कळ अडचणी आहेत; पण त्यांनी सर्व परिस्थिती स्वीकारली आहे. अशा स्थितीतही त्या साधनेत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतात. एवढे त्रास असतांना एखादी व्यक्ती खचून गेली असती; पण ताईंची साधना आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा यांमुळे त्या आनंदात असतात.

‘परात्पर गुरुदेवांनीच त्यांचे गुण माझ्या लक्षात आणून दिले. ते गुण मला आत्मसात करता येऊ देत’, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– कु. अदिती सुखटणकर, केरळ (६.८.२०२४)