मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवणारी चिप : लाभ आणि संभाव्य हानी !
मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवणारी चिप व्यक्तीमध्ये बसवणे, हे आगामी काळात ‘विनाशकाले विपरीतबुद्धिः’ होणार नाही ना ‘न्युरालिंक’ आस्थापनाचा नवा शोध !
‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी ‘न्युरालिंक’ या आस्थापनाद्वारे मानवी मेंदूत बसवण्याच्या ‘चिप’विषयी (चिप म्हणजे विद्युत् चकती ज्यात विद्युत् प्रवाह असतो.) २९ जानेवारी २०२४ या दिवशी घोषणा केली. ‘न्युरालिंक’ आस्थापनाने दावा केला आहे की, या ‘ब्रेनचिप’चा लाभ पार्किन्सन (पार्किन्सन रोग म्हणजे कंपवात, ज्यामध्ये रुग्णाच्या मेंदूतील जो भाग शरिराच्या हालचालींवर नियंत्रण करतो, त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश होतो), फेफरे, नैराश्य, मेंदूच्या दुखापती, तीव्र वेदना, अंधत्व आणि बहिरेपणा यांसारखे आजार असणार्या रुग्णांसाठी उपयोग होईल; पण याचे भविष्यात वेगळेच परिणामसुद्धा दिसतील किंवा धोकेही असतील.
न्युरालिंक चिप मेंदूत बसवल्यावर होणारे लाभ आणि हानीन्युरालिंक चिप मेंदूत बसवल्याने मनातील विचारांनुसार घटना कशा घडतील ?, लाभ कसा होईल ? याची काही उदाहरणे पाहूया. अ. मनात विचार येताच दूरचित्रवाणीसंचावरील वाहिनी पालटली जाणे : समजा, तुम्ही दूरचित्रवाणी संचासमोर बसून बातम्या पहात आहात. तुम्हाला वाहिनी पालटायची आहे; पण रिमोट तुमच्याजवळ नाही. तुम्ही असा विचार करत आहात, तोच तुम्हाला हवी असलेली वाहिनी समोर दिसू लागेल, ते ही रिमोटखेरीज ! असे शक्य होऊ शकेल. आ. ‘पॉवरपॉईंट’वर सादरीकरण करतांना मनातील विचारानंतर ‘स्लाईड’ (चित्र) पालटणे : एका बैठकीमध्ये किंवा सहस्रो लोकांसमोर तुम्ही ‘पॉवरपॉईंट’वर (पॉवरपॉईंटवर सादरीकरण करणे म्हणजे संगणकीय सॉफ्टवेअर, ज्यात छायाचित्रे, व्हिडिओ यांचा वापर करून एखादा विषय समजावून सांगणे सोपे होते.) सादरीकरण करत आहात. प्रत्येक वेळी ‘स्लाईड’ पॉईंटरने पालटावी लागते, तेव्हा बोलण्याची लय तुटते आणि समोरचे लोकही चुळबूळ करतात; पण आता तसे होणार नाही. तुम्ही विचार करत आहात, तोपर्यंत पॉवरपॉईंटची स्लाईड पालटलेली असेल. इ. वस्तूंच्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात, तोपर्यंत तुमची गाडी चालू झालेली असेल. घराचा दरवाजा उघडलेला असेल. चिप मेंदूत बसवल्यामुळे होणारे संभाव्य धोकेअ. दुसर्याच्या मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवता येण्याची शक्यता असणे : ज्या व्यक्तीच्या मेंदूत न्युरालिंक चिप बसवली जाईल, तिला समोरच्या माणसाला न सांगता त्याच्याकडून काम करवून घेता येईल. थोडक्यात दुसर्याच्या मानवी मेंदूवरपण नियंत्रण मिळवता येईल. कदाचित् असेही होऊ शकेल की, तुमच्या-माझ्या मेंदूवर अन्य कुणीतरी नियंत्रण मिळवू शकेल. हे धोके शास्त्रज्ञ किंवा इतर क्षेत्रांतील तज्ञ व्यक्त करत आहेत. आ. चिपद्वारे दुसरेच कुणीतरी नियंत्रण मिळवण्याची भीती असणे : जुलै २०२३ मध्ये स्वित्झर्लंडमधील विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी असे उपकरण बनवले की, ज्याने अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला केवळ विचार करून चालण्यास सक्षम केले. न्युरालिंक चिपचा धोका म्हणजे हे उपकरण ब्लूटूथ किंवा घरातील इंटरनेट किंवा ‘वायफाय’लासुद्धा जोडता येणार आहे. भविष्यात ते आपल्या भ्रमणभाषच्या नेटवर्कलाही जोडता येईल. यातच भीती आहे. कदाचित् भविष्यात रुग्णाच्या मेंदूमध्ये बसवलेल्या चिपवर ‘ब्लूटूथ’ किंवा ‘वायफाय’वरून दुसरेच कुणीतरी नियंत्रण मिळवेल आणि तोच त्या रुग्णाला इतर गोष्टी करण्यासाठी आज्ञा देईल. इ. उद्योजक, राजकारणी किंवा आतंकवादी यांच्याकडून होऊ शकणारे विपरित कृत्य ! : शास्त्रज्ञांना भीती वाटते की, ही चिप इतर लोकांच्या हाती सापडली की, मग ते उद्योजक, राजकारणी किंवा आतंकवादी असोत, ते सामान्य लोकांच्या मेंदूतही अशी चिप बसवून त्यांच्याकडून हवी ती कामे करवून घेतील. लेखक : डॉ. नानासाहेब थोरात, विज्ञान संशोधक, सातारा |
१. ‘न्युरालिंक चिप’विषयीची घोषणा !
१ अ. चिपसाठी प्राण्यांवर चाचण्या ! : ‘न्युरालिंक’ आस्थापनेद्वारे मस्क यांनी मेंदू-संगणक इंटरफेसमध्ये (Brain Computer Interfaces (BCIs)) महत्त्वपूर्ण पालट करण्याचा विश्वास दाखवला. यात व्यक्तीच्या मेंदूमध्ये मेंदू-वाचन उपकरण स्थापित केले आहे. आस्थापनाच्या दाव्यानुसार हे उपकरण गंभीर अर्धांगवायू असलेल्या व्यक्तीला संगणक, रोबोटिक हात, व्हिलचेअर किंवा इतर उपकरणे यांवर केवळ विचार करून नियंत्रण ठेवता यावे, या उद्देशाने सिद्ध केले आहे. या उपकरणाच्या प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत; मात्र मानवी चाचण्यांची माहिती गुप्त आहे.
१ आ. कोरोना महामारीच्या काळात ‘चिप’ची निर्मिती ! : वर्ष २०२०-२१ मध्ये जग कोरोना महामारीमुळे बंद होते आणि शास्त्रज्ञ, विद्यापिठे अन् औषधी आस्थापने कोरोना प्रतिबंधक लसीच्या शोधात गुंतले होते, त्या वेळी न्युरालिंक मानवी मेंदूत बसवायची चिप बनवत होती, तसेच प्राण्यांवर चाचण्या करत होती. त्या वेळीच त्यांनी याची घोषणा केली होती; पण जगातील कोट्यवधी लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. २९ जानेवारी २०२४ या दिवशी मस्क यांनी स्वतः याविषयी घोषणा केली, तेव्हा जागतिक प्रसारमाध्यमे, शास्त्रज्ञ आणि इतर यांचे याकडे लक्ष गेले.
१ इ. न्युरालिंकचे तंत्रज्ञान आणि प्रक्रिया : न्युरालिंक चिपमध्ये ६४ लवचिक ‘पॉलिमर इलेक्ट्रोड्स’ आहेत, जे मेंदूमधील १ सहस्र ६४ ठिकाणांहून मेंदूच्या वेगवेगळ्या क्रियांचे ध्वनीमुद्रण करणार आहेत. ती माहिती त्याच चिपमध्ये साठवली जाईल, तिथेच त्यावर प्रक्रियाही केली जाणार आहे. याच माहितीच्या आधारे एखादी व्यक्ती तिच्यासमोरची वस्तू नियंत्रित करणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर गंभीर अर्धांगवायू झालेला रुग्ण रुग्णशय्येवर असतो, त्याला समोर जे काही चालू आहे, ते दिसते, समजतही असते; पण हालचाल करता येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही. न्युरालिंक चिप बसवल्यानंतर ती व्यक्ती केवळ विचार करील की, समोरच्या दूरचित्रवाणी संचावरील वाहिनी पालटायला पाहिजे. मग लगेच ती पालटली जाईल. अपंग व्यक्ती विचार करील की, माझी चाकांची आसंदी माझ्याजवळ आली पाहिजे, लगेचच ती जवळ येईल.
यात घाबरण्यासारखे काहीच नाही, हे तंत्रज्ञान उपयोगीच आहे. गेल्या दशकात अनेक शास्त्रज्ञांनी अशी उपकरणे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
४. चाचण्या वैज्ञानिक नैतिकतेला धरून नाहीत !
‘असे अघटित काही होणार नाही’, हे गृहित धरले, तरी आजच्या क्षणालासुद्धा ‘न्युरालिंकचा हा शोध वैज्ञानिक नैतिकतेला धरून नाही’, असा उघड आरोप जगातील सहस्रो शास्त्रज्ञांनीच नव्हे, तर राजकारणी आणि तत्त्वज्ञ यांनीही केला आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये काही अहवाल समोर आले, ज्यामध्ये आस्थापनाच्या चाचण्यांमध्ये वापरलेली माकडे अन् इतर प्राणी यांवर विपरीत प्रभाव पडला. संशोधनाचा एक भाग म्हणून १२ माकडांना अधू केल्याचा किंवा मारल्याचा आरोप आहे. आस्थापनावर प्राण्यांशी गैरवर्तनाचा आणि दूषित हार्डवेअरद्वारे संसर्गजन्य रोगजनकांच्या मानवी संपर्कास धोका निर्माण केल्याचा आरोप आहे. अंतर्गत कर्मचार्यांच्या तक्रारींमध्ये आरोप आहेत की, प्राण्यांच्या चाचणीत घाई केली गेली. परिणामी प्राण्यांचा मृत्यू झाला.
‘रॉयटर्स’च्या (कॅनडा येथील जगप्रसिद्ध, विश्वासू वृत्तसंस्थेच्या) म्हणण्यानुसार या सर्व प्रकारांची अमेरिकन कृषी विभागाकडून पडताळणी करण्यात आली. वर्ष २०२२ मध्ये ‘रॉयटर्स’ने पुनरावलोकन केलेल्या नोंदी दर्शवतात की, वर्ष २०१८ पासून २८० मेंढ्या, डुक्कर आणि माकडे यांसह दीड सहस्र प्राणी मारले. एवढेच काय, तर शास्त्रज्ञांनी अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासन यंत्रणेलासुद्धा (‘एफ्.डी.आय.’लासुद्धा) घाईघाईत मानवी चाचणीस मुभा दिल्याने आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे.
५. ‘युनेस्को’ने धोके टाळण्यासाठी घेतलेला पुढाकार !
‘युनेस्को’च्या (संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या) अहवालानुसार न्युरोटेक्नॉलॉजी म्हणजेच मानवी मेंदूवर संशोधन करणारी विज्ञानाची शाखा आणि त्यावर आधारित उद्योगधंदे यांची वार्षिक उलाढाल सुमारे ३३ अब्ज डॉलर (२७७० अब्ज रुपये) आहे. न्युरालिंक यात प्रतिदिन कोट्यवधी डॉलरची भर घालत आहे. १० ते १२ वर्षांत हा उद्योग बलाढ्य उद्योगांना मागे सारून ‘ट्रिलियन’ डॉलरचा उद्योग होईल.
‘युनेस्को’ने काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये न्युरोटेक्नॉलॉजीचे भविष्यातील लाभ आणि तोटे, तसेच त्याचे मानवी सामाजिक वर्तनावरील परिणाम यांवर जागतिक परिषद घेतली. यामध्ये जगातील सहस्रो तत्त्वज्ञानांनी न्युरोटेक्नॉलॉजीवर जागतिक आचारसंहिता (कोड ऑफ कंडक्ट) सिद्ध करण्याची मागणी केली, म्हणजे त्याचे भविष्यातील दुरुपयोग रोखता येतील.
६. न्युरोटेक्नॉलॉजी आणि त्यासंबंधीचे उद्योग जगात सर्वांत बलाढ्य होऊ शकतील !
इस्रायली लेखक आणि इतिहासाचे अभ्यासक युवाल नोवा हरारी म्हणतात की, भविष्यात कोणत्याही इतर वस्तूंपेक्षा म्हणजे भ्रमणभाष, चारचाकी किंवा सॉफ्टवेअर असो, मानवी मेंदूवर नियंत्रण ठेवणार्या उत्पादनांना जगात पुष्कळ मागणी असेल. वर्ष २०५० नंतर हाच उद्योग जगातील सर्वांत बलाढ्य असेल. कदाचित् न्युरालिंकपण हेच ओळखून असेल. आज आपण अनेकदा एखाद्याला सहज बोलून जातो, ‘तुझा मेंदू गहाण ठेवला आहेस का ?’ कदाचित् भविष्यात हे खरेही होईल !