बदलापूर येथे आक्षेपार्ह विधानाप्रकरणी वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा नोंद !
ठाणे, २२ ऑगस्ट (वार्ता.) – शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी यांचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बदलापूर येथे आंदोलन चालू असतांना वामन म्हात्रे महिला पत्रकाराला उद्देशून म्हणाले होते की, तू अशा बातम्या देते, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. त्यांच्या या विधानाविषयी पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.
याविषयी प्रतिक्रिया देतांना म्हात्रे म्हणाले, ‘‘मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोचवली जात होती. ‘बलात्कार’ या शब्दाचा वापर केला जात होता. नक्की काय झाले ? याची माहिती घ्या, असे आवाहन मी पत्रकारांना केले; मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला.’’