पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी सांगितलेले काही अनुभव आणि त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

१. लहानपणापासून कीर्तने ऐकल्याने मनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण होणे अन् वयाच्या १२ व्या वर्षापासून स्वतः कीर्तन करण्यास आरंभ करणे

‘माझा जन्म बडोद्याचा आहे. आमच्या घराजवळ एक मोठा रामदासी मठ होता. तेथील श्रीरामाच्या मंदिरात नेहमी कीर्तने आणि प्रवचने व्हायची. मी वयाच्या ७ व्या वर्षापासून कीर्तन ऐकण्यासाठी मठात जात असे. मी कीर्तन ऐकण्यात रंगून जायचो. सर्वांना आश्चर्य वाटायचे की, एवढा लहान मुलगा कीर्तन ऐकतो ! १० – १२ वर्षांचा असतांना मी कीर्तनात वही-लेखणी घेऊन बसायचो आणि कीर्तनातील श्लोकातील पहिले १ – २ शब्द लिहायचो. त्यानंतर श्लोक पूर्ण करण्यासाठी मी त्या कीर्तनकारांना जाऊन भेटत असे. तेही मोठ्या हौसेने मला साहाय्य करायचे. त्यांतून माझ्या मनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण झाले. वयाच्या १२ व्या वर्षी मी स्वतः कीर्तन करण्यास आरंभ केला.

श्री. राम होनप

२. श्री गजानन महाराज यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

२ अ. श्री गजानन महाराज स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून जीवनात येणे

२ अ १. एका व्यक्तीने स्वप्नात येऊन ‘अर्धे सोड, अर्धे सोड’, असे सांगणे आणि त्याचा अर्थ न उलगडणे : पूर्वी मला श्री गजानन महाराज यांचे नावही ठाऊक नव्हते, तरीही त्यांनी मला पुढील प्रसंगाद्वारे स्वतःकडे आकर्षित करून घेतले. वर्ष १९७६ मध्ये एकदा मी नागपूरमधील रामनगर येथील एका राममंदिरात रामनवमीच्या उत्सवासाठी गेलो होतो. तेथे प्रतिपदेपासून नवमीपर्यंत माझी प्रवचने होती आणि रामनवमीला रामजन्माचे कीर्तन होते. माझा मुक्काम नानीवडेकर मंगल कार्यालयात तिसर्‍या मजल्यावर होता. श्री. नानीवडेकर हे माझे मामा होते.

रामनवमीच्या आदल्या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले, ‘मी कोकणातील घरी आहे. तेथे दुपारी जेवण झाल्यावर चुलत भावांशी गप्पा मारत मी पडवीमध्ये पहुडलो आहे. तेव्हा मला झोप लागली. झोपेमध्ये ‘बाहेरून कुणीतरी हाक मारत आहे’, असे मला वाटले. मी खिडकीच्या गजातून बाहेर पाहिले, तर समोर एक माणूस चालला होता. तो माणूस उंच, वयस्कर आणि विवस्त्र होता. तो माणूस हात वर करून माझ्याकडे पहात पुढे जात होता. तो मला म्हणाला, ‘अर्धे सोड, अर्धे सोड.’ तेव्हा मला आश्चर्य वाटले की, हा माणूस कोण आहे ? मी उठून पहातो, तर तो माणूस पुढे निघून गेला होता आणि त्यानंतर तो नाहीसा झाला.’ तेव्हा या स्वप्नाचा अर्थ मला समजला नाही.

‘कीर्तनात अश्लील विनोद करणे’, हा नीचपणा आहे !

‘भक्ती आणि धर्म यांचा प्रसार करणे’, हा कीर्तनाचा उद्देश आहे. श्रोत्यांना रंगवून ठेवण्यासाठी कीर्तनात एखादा विनोद सांगण्यात काही गैर नाही; परंतु ‘विनोद करण्यासाठीच कीर्तन करणे’, हे चुकीचे आहे. ‘कीर्तनात अश्लील विनोद करणे’, हा नीचपणा आहे. ‘काही कीर्तनकार कीर्तनात देवाचे नाव थोडाच वेळ घेतात आणि बराच वेळ फालतू विनोद करतात’, हे अत्यंत अयोग्य आहे. जगात मूर्ख लोक भरपूर असतात. त्यांना अशी कीर्तने आवडतात. कीर्तनाची संस्कृती जपली पाहिजे. त्यात नुसता बाष्कळपणा नको.’
– पू. भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

२ अ २. मामांनी स्वप्नातील व्यक्ती, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज असल्याचे सांगून  महाराजांच्या गूढ बोलण्याचा उलगडा करणे : मी झोपेतून उठून खाली मामांकडे गेलो. मामा प्रतिदिन पहाटे उठून एका बाकावर जप करण्यासाठी बसत असत. मी त्यांना वरील स्वप्न सांगितले. तेव्हा मामा मला म्हणाले, ‘‘तो माणूस, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज होते.’’ मी त्यांना विचारले, ‘‘ते आता शेगावला आहेत का ?’’ तेव्हा मामा म्हणाले, ‘‘त्यांनी देहत्याग केलेला आहे.’’ मी मामांना विचारले, ‘‘स्वप्नात ते मला ‘अर्धे सोड, अर्धे सोड’, असे म्हणाले. त्याचा अर्थ काय ?’’ मामांनी मला विचारले, ‘‘तू सध्या एखादे मोठे काम हाती घेतले आहेस का ? तसे असल्यास तुला त्यात यश मिळणार नाही. ‘त्या कामातील अर्धे काम न्यून कर, म्हणजे तुला त्यात यश येईल’, असे प.पू. गजानन महाराज यांना सांगायचे आहे.’’ मी मामांना म्हटले, ‘‘माझी यात्रा कंपनी असून मी एक यात्रा ठरवली आहे. त्यात रेल्वेने प्रथम ‘काशी, गया आणि प्रयाग’ अन् त्यानंतर ‘ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ आणि शेवटी मुंबई’, असा प्रवास करायचा आहे. त्यासाठी मी रेल्वेचा एक डबा आरक्षित केला आहे.’’ हे ऐकून मामा म्हणाले, ‘‘अगदी चुकीचे नियोजन आहे. आता मे मास चालू असून काशी, गया आणि प्रयाग येथे प्रचंड उष्णता असते; पण याच मासात ऋषिकेश, बद्रीनाथ अन् केदारनाथ येथे जाणे चांगले; कारण ते अतीथंड प्रदेश आहेत. त्यामुळे श्री गजानन महाराज यांनी तुला ‘अर्धा कार्यक्रम न्यून कर’, असे सुचवले आहे.’’ (४.६.२०२४)

संकलक : श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/827614.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक