भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत झालेल्या लेखात आपण ‘भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !’ याविषयीचे लिखाण वाचले. आजपासूनच्या लेखात ‘भारतीय तत्त्वज्ञानातील पुनर्जन्म विचारा’विषयीचे लिखाण प्रसिद्ध करत आहोत. (लेखांक ४०)
या पूर्वीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/826973.html
१. नवे शरीर आणि पाप-पुण्य कर्म !
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक १३
अर्थ : ज्याप्रमाणे जिवात्म्याला या शरिरात बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही.
दुसरेही एक गीतावचन अत्यंत प्रसिद्ध आहे.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक २२
अर्थ : ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जिवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्या नव्या शरिरात जातो. मृत्यू म्हणजे देह आणि देही यांची फारकत ! हा जो देही, म्हणजे देहाचा धनी तो त्या देहाला टाकून जातो. हाच मृत्यू !
या देहात असतांना जिवाने जी कर्मे केली, त्याचे फळ त्याला भोगावे लागते. ते फळ त्या कर्मानुसार असते. वेदांच्या दृष्टीने त्याने केलेले कर्म पाप असेल, तर तो त्यानुसार अधम योनीत जन्म घेतो आणि ते पुण्यकर्म असेल, तर तो उच्च योनीत स्वर्गसुख भोगतो. ही अनादी विश्वव्यवस्था आहे. जग म्हणजे मोठा संगणक आहे. (World is a big Computer.) त्यामुळे ही व्यवस्था आपोआप (Automatic) चालणारी आहे.
२. कर्मफळ केवळ मनुष्यालाच असणे आणि पशू-पक्ष्यांचा जन्म म्हणजे भोगजन्म असल्याने त्यांना कर्मफळ नसणे !
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात,
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ।।
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ।।
– तुकाराम गाथा, अभंग २८५४, ओवी १ आणि २
अर्थ : उत्तम कर्मे करून जो द्रव्य जमवतो आणि निरपेक्ष अन् उदार बुद्धीने जो त्याचा खर्च करतो, तो उत्तम अशा प्रकारची गती प्राप्त करून घेतो आणि त्याला उत्तम उत्तम असे जन्म प्राप्त होतात.
अर्थात् येथे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हा नियम मनुष्यजन्मालाच आहे; कारण केलेल्या कर्मांची फळे केवळ भोगण्यासाठी अन्य सर्वच जन्म आहेत. त्या जन्मांत जी कर्मे केली जातात, ती निष्फळ असतात; कारण पाप किंवा पुण्य हे पशू-पक्षी कधीच करत नाहीत. सर्व प्राणिजात केवळ कर्तव्यकर्मेच करतात. त्यांनाही भावना, बुद्धी असते; पण ती मर्यादित असते. त्यांना ईश्वराने घालून दिलेल्या आचारधर्माच्या बाहेर जाऊन ते कधीच वागत नाहीत. जी जीवनपद्धत त्यांना ईश्वराने त्यांच्या उत्पत्तीसह घालून दिली आहे, तीच त्यांचे जीवन असते; म्हणून मनुष्येतर प्राणी पाप किंवा पुण्य करू शकत नाहीत. त्यांचा केवळ भोगजन्म असतो. अर्थात्च त्यांच्या कर्माचे फळ नसते. कर्मफल मनुष्यालाच असते. मनुष्याच्या जन्मातही पूर्वकर्मानुसारच प्राप्त होणार्या अनेक गोष्टी आहेत.
३. ७ प्रकारच्या गती !
३ अ. पुण्य : मोक्षज्ञानी भक्त भगवद्स्वरूपात एकरूप होतो आणि पुन्हा जन्माला येत नाही. असे भाग्य कोटी-कोटीतून एखाद्यालाच लाभते. याला मुक्ती किंवा मोक्ष म्हणतात.
३ आ. श्रेष्ठ मनुष्यजन्म : साधू, सत्पुरुष, परोपकारी, पवित्र कुटुंबात उत्तम जन्म !
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ४१
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ४२
अर्थ : योगभ्रष्ट पुरुष शुद्ध आचरण असणार्या श्रीमंतांच्या घरात किंवा ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो.
३ इ. मध्यम मनुष्यजन्म : काही पुण्याईने मनुष्यजन्म मिळतो; पण तो सामान्य, मध्यम अशा कुटुंबात ! उपजीविकेसाठी कष्ट, कष्टाने यश. आई-वडील अन् भावंडांचा बेताचाच आधार. सारे काही मध्यम !
३ ई. हीन मनुष्यजन्म : केवळ शरिराने आकार माणसाचा ! बाकी वर्तन क्रूर, घराणे नीच, भोवताली हलकट माणसांचा संपर्क, व्यसनांत डुंबलेला, जन्मात देवाचे नावही घेण्याची बुद्धी नाही. उपासना, भक्ती, ज्ञानाचा दुरान्वयानेसुद्धा संबंध नाही. जवळजवळ पशूच ! (क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)