श्रीकृष्णाच्या भावविश्वात रमणारी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. आराध्या महेश घाणेकर (वय १२ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आराध्या घाणेकर ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२० मध्ये ‘कु. आराध्या घाणेकर ही उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.७.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
(‘वर्ष २०२० मध्ये कु. आराध्या हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
१. ‘कु. आराध्या घरात स्वच्छता करतांना प्रत्येक वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवते.
२. तिने चांगले विचार ऐकले किंवा वाचले, तर ती ते विचार लगेच वहीत लिहून ठेवते.
३. देवतांची चित्रे भावपूर्ण काढणे : आराध्या देवतांना प्रार्थना करून त्यांच्याशी बोलत बोलत त्यांची चित्रे काढते. चित्र काढून झाल्यावर ‘देवानेच चित्र काढून घेतले’, याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते.
४. शाळेत विनामूल्य भजन शिकवणार्या बाईंविषयी कृतज्ञता वाटणे : आराध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. शाळेत प्रत्येक शनिवारी भजनांचा तास असतो. घरी आल्यावर ‘बाईंनी काय शिकवले ?’, हे ती मला सांगते. ती म्हणते, ‘‘माझी शाळा इंग्रजी माध्यमाची असली, तरी चांगली आहे. ‘आम्हाला प्रत्येक सणाची माहिती, देवतांच्या गोष्टी आणि भजने शिकायला मिळतात’, ही देवाची कृपा आहे.’’ भजन शिकवणार्या बाईंबद्दल तिला पुष्कळ आत्मीयता वाटते. ती मला कृतज्ञतापूर्वक सांगते, ‘‘बाई आम्हाला भावपूर्ण भजने शिकवतात. त्यांची पुष्कळ साधना आहे. विशेष म्हणजे त्या सेवा म्हणून विनामूल्य शिकवतात. त्यांचा त्याग किती आहे !’’
५. सात्त्विकतेची आवड
अ. आराध्या धर्माचरण करण्याचा प्रयत्न करते, उदा. कुंकू लावणे, केस न कापणे. ती ठामपणे सांगते, ‘‘मी माझे केस कधीच कापणार नाही.’’
आ. तिने शाळेत तिच्या वर्गातील मुलांना सांगितले, ‘‘आई’ या शब्दात चैतन्य आहे. ‘मम्मी’ इंग्रजी या शब्दाचा अर्थ ‘मनुष्य किंवा पशू यांचे शव’, असा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईला ‘मम्मी’ न म्हणता ‘आई’ म्हणा.’’
इ. एकदा मी कृष्णाचे भजन ऐकत होते. ते चित्रपटातील भजन होते. ते ऐकताच आराध्या मला म्हणाली, ‘‘आई, हे भजन चित्रपटातील आहे. तू जर संतांनी गायलेले हेच भजन ऐकले, तर त्याचा तुला अधिक लाभ होईल.’’
६. वर्गातील मुलाचे प्रबोधन करून त्याला त्याच्या दप्तराची राधा-कृष्णाचे चित्र असलेली की-चेन काढायला सांगणे : वर्गातील एका मुलाने त्याच्या दप्तराला राधा-कृष्णाचे चित्र असलेली की-चेन लावली होती. आराध्याने त्याला ती काढण्यास सांगितले. त्या वेळी आराध्याने त्याला सांगितले, ‘‘की-चेन खाली पडून फुटू शकते. त्यामुळे आपल्या देवतांचे विडंबन होईल. देव ही शोभेची वस्तू नाही.’’ त्याने त्या दिवशी आराध्याचे ऐकले नाही. दुसर्या दिवशी त्याने दप्तराची की-चेन काढली होती. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याने आराध्याला सांगितले, ‘‘तू योग्य सांगितलेस. की-चेन थोडी फुटली होती; म्हणून मी ती काढून ठेवली.’’
७. आश्रमात जाऊन सेवा करण्याची ओढ असणे : आराध्याने तिची वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वीच मला सांगितले, ‘‘मला सुटीत रामनाथी आश्रमात रहायला जायचे आहे. आपण दोघीही तेथे जाऊयात. जर तुला येणे शक्य नसेल, तर मी एकटीही आश्रमात जाऊन राहू शकते. आश्रमात गुरुदेव आणि साधक माझी काळजी घेतील. मला आश्रमात राहून सेवा करायची आहे.’’ ती माझ्याविना कुणाकडेच एकटी रहात नाही; मात्र तिची मला सोडून आश्रमात रहाण्याची सिद्धता आहे.
८. संतांप्रतीचा भाव : ७.४.२०२४ या दिवशी संध्याकाळी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) या दोघी माझी आजी पू. (श्रीमती) आनंदी पाटीलआजी (सनातनच्या ५७ व्या संत, वय ७७ वर्षे) यांना भेटायला त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी आराध्याही त्यांना भेटली. तेव्हा आराध्याचा भाव जागृत झाल्यामुळे तिच्या डोळ्यांत भावाश्रू आले. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना पाहून ‘प्रत्यक्ष राधाच आपल्याला भेटली’, असे तिला वाटले. आराध्या सतत त्यांच्या चरणांकडे बघत होती. तिला त्यांचे चरण सोनेरी रंगाचे दिसत होते. त्या वेळी तिला जाणवले, ‘त्यांच्या चरणांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि ते ती ग्रहण करत आहे.’ दोन्ही संत परत जाईपर्यंत ती भावस्थितीत होती. ‘त्याच स्थितीत अखंड रहावे’, असे तिला वाटत होते.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची ओढ : आराध्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटायची इच्छा होती; पण त्यांची भेट होत नव्हती. मी तिला सांगितले, ‘‘ते तुला स्वतःहून बोलवतील. तू केवळ प्रतिदिन त्यांना प्रार्थना कर.’’ त्याप्रमाणे ती प्रार्थना करू लागली. मला २.२.२०२३ या दिवशी एका सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे होते. त्याच दिवशी माझ्या भाचीच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता; म्हणून मी आराध्याला म्हणाले, ‘‘तू माझ्या समवेत रामनाथीला आली नाहीस, तरी चालेल. तू इथे मावशीकडे राहू शकतेस.’’ त्यावर ती लगेच म्हणाली, ‘‘आई, वाढदिवस प्रत्येक वर्षी येईल; पण ‘गुरुदेवांकडे पुन्हा कधी जायला मिळेल ?’, ते ठाऊक नाही. त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे. आता मला रामनाथीला जायची सिद्धता करायची आहे.’’ ‘मी तिला रामनाथीला घेऊन जाणार आहे’, हे समजल्यावर तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तिने गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
१०. श्रीकृष्णाप्रतीचा भाव
अ. आराध्याला बर्याच दिवसांपासून बाळकृष्णाची लहान मूर्ती हवी होती. १५ – २० दिवसांपूर्वी तिने हट्ट करून मला श्रीकृष्णाची मूर्ती आणायला सांगितली. तिने कृष्णासाठी लागणारी वस्त्रे, आभूषणे, बासरी इत्यादी खरेदी केले. श्रीकृष्णाला झोपण्यासाठी तिने खोक्याचा पलंग बनवला.
आ. आराध्या प्रतिदिन सकाळी शिकवणीला जाण्याआधी कृष्णाला हाक मारून आणि टाळ्या वाजून उठवते. ती त्याला उटणे लावून अंघोळ घालते, नंतर त्याला सजवते आणि नैवेद्य भरवते. ती सतत त्याच्याशी बोलत असते. ‘कृष्णासाठी आणखी काय करू ?’, असे तिला वाटते. रात्री ती कृष्णाचे पाय चेपते आणि त्याला थोपटून झोपवते.
इ. घरात कोणतीही चांगली घटना घडली, तर ‘ती कृष्णामुळे घडली आहे’, असे ती सांगते.
ई. शिकवणी संपल्यावर ती एकटी घरी येते. तेव्हा रस्ता ओलांडतांना ती कृष्णाला सांगते, ‘तू माझ्या समवेत ये. मला एकटीला भीती वाटते.’ त्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी एकही गाडी येत नाही. तिच्याकडून रस्ता सहज ओलांडला जातो.
उ. मला सतत बरे वाटत नसल्यामुळे ती मला सांगते, ‘‘आई, तू घाबरू नकोस. आता कृष्ण आला आहे ना ! तो तुला बरे करील. तो तुझ्याकडून त्याची सेवाही करून घेईल.’’
ज्या दिवशी तिने कृष्णाची मूर्ती घरी आणली, त्या दिवसापासून घरातील वातावरण प्रसन्न आणि कृष्णमय झाले आहे. आम्हाला घरात श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवायला मिळत आहे.
११. जाणवलेला पालट – व्यष्टी साधनेचे प्रयत्न करणे : आराध्या पूर्वी नामजप करत नव्हती. आता तिने जपमाळ आणली आहे. सकाळ-संध्याकाळ ती ३-३ माळा जप करते, संध्याकाळी सर्व स्तोत्रे म्हणते, तसेच भावजागृतीचा प्रयोग आणि अत्तर अन् कापूर यांचे उपाय करते. आराध्या ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्ग ऐकते.
१२. आराध्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१२ अ. आराध्याने धीर दिल्याने आणि तिने सांगितल्याप्रमाणे भाव ठेवल्याने मनातील भीती अन् नकारात्मकता नाहीशी होणे : मी आजारी असतांना आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला रुग्णालयातील अतीदक्षता विभागात एक दिवस भरती होऊन विशिष्ट इंजेक्शन्स घ्यावी लागतील.’’ तेव्हा मला पुष्कळ भीती वाटत होती. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. त्या वेळी आराध्याने सांगितले, ‘‘आई, तू सकारात्मक रहा. या इंजेक्शनने तुला पूर्ण बरे वाटणार आहे. देवानेच हे नियोजन केले आहे. ‘या इंजेक्शनच्या माध्यमातून तुझ्या संपूर्ण शरिरात चैतन्य पसरणार आहे’, असा भाव ठेव.’’ तिच्या या सकारात्मक विचारांमुळे माझ्या मनातील इंजेक्शनबद्दलची भीती आणि नकारात्मकता नाहीशी झाली. तिने सांगितल्याप्रमाणे मी भाव ठेवला. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ‘माझ्या शरिरात चैतन्यच पसरत आहे’, असे मला वाटले. माझी सतत भावजागृती होत होती आणि मला गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.
१२ आ. आराध्याने दिलेल्या साधनेच्या दृष्टीकोनामुळे स्वतःची चूक लक्षात येऊन सकारात्मक रहाता येणे : आमच्या घरामध्ये एक कीटक भूमीवर चालत होता. तेव्हा मी आराध्याला म्हणाले, ‘‘हा कीटक इथे कुठून आला ? ‘हा घरात येणे चांगले नसते’, असे मी ऐकले आहे.’’ त्यावर ती लगेचच म्हणाली, ‘‘आई, त्या कीटकाचा काय दोष ? ‘चांगले-वाईट’, असे काही नसते. त्याला देवानेच बनवले आहे. त्यातही जीव आहे. तो देवाने बनवला आहे. त्यामुळे तो चांगलाच आहे.’’ तिचे बोलणे ऐकून मला कृतज्ञता वाटली. इतके दिवस त्या कीटकाला पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दल येणारे नकारात्मक विचार नाहीसे झाले. माझी चूक माझ्या लक्षात आली.
१२ इ. आराध्याने सांगितल्याप्रमाणे ‘परिस्थिती स्वीकारल्यावर देव इच्छा पूर्ण करतो’, याची अनुभूती येणे : मला एक सेवा करण्याची इच्छा होती; पण मला ती सेवा मिळत नव्हती. ‘उत्तरदायी साधकांनी ती सेवा मला द्यायला हवी’, अशी माझी अपेक्षा होती. मी आराध्याला माझ्या मनातील विचार सांगितले. त्या वेळी ती देव्हार्यातील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे बोट दाखवत म्हणाली, ‘‘आई, हे आहेत ना ! यांना सर्व सांग. तेच तुला ती सेवा देतील. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार कर.’’ तिचे ते बोलणे ऐकून मी लगेच स्थिर झाले. दुसर्या दिवशी दुपारी एका साधिकेचा भ्रमणभाष आला आणि तिने मला ती सेवा करण्यास सांगितली. आराध्याच्या परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे हे घडून आले. तिच्यामुळेच मी स्थिर राहिले आणि परिस्थिती स्वीकारली. तेव्हा लगेच देवाने माझी इच्छा पूर्ण केली.
१३. आराध्याचे स्वभावदोष : हट्टीपणा, भ्रमणभाष पहाण्यात वेळ वाया घालवणे, खोटे बोलणे आणि उलट बोलणे.
‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी हे लिखाण करू शकले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. कपिला महेश घाणेकर (कु. आराध्या हिची आई), डोंबिवली (पश्चिम), जिल्हा ठाणे. (१४.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |