Kolkata Rape Murder Case : ३० वर्षांत अन्‍वेषणात पोलिसांनी केलेला एवढा निष्‍काळजपीपणा पाहिला नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

  • कोलकाता येथील महिला डॉक्‍टरवरील बलात्‍कार आणि हत्‍या यांचे प्रकरण

  • सीबीआयने सादर केलेल्‍या अहवालात पोलिसांनी पुराव्‍यांमध्‍ये छेडछाड केल्‍याचा उल्लेख

नवी देहली – कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयामध्‍ये झालेल्‍या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्‍टरवर बलात्‍कार आणि हत्‍या यांच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात झालेल्‍या सुनावणीच्‍या वेळी न्‍यायालयाने कोलकाता पोलिसांवर कठोर ताशेरे ओढले. न्‍यायमूर्ती पारदीवाला यांनी म्‍हटले की, कोलकाता पोलिसांच्‍या भूमिकेवर शंका आहे. माझ्‍या ३० वर्षांच्‍या कारकीर्दीत अन्‍वेषणात इतका निष्‍काळजीपणा करण्‍यात आल्‍याचे मी कधीच पाहिले नाही.

तत्‍पूर्वी सीबीआयने न्‍यायालयात सादर केलेल्‍या आतापर्यंतच्‍या अन्‍वेषणाच्‍या अहवालात ‘पोलिसांनी गुन्‍ह्याच्‍या ठिकाणी असलेल्‍या पुराव्‍यांमध्‍ये छेडछाड केली’, असे म्‍हटले आहे.

डॉक्‍टरांनी कामावर परतावे ! – सरन्‍यायाधिशांचे आवाहन

देशभरात डॉक्‍टरांकडून या प्रकरणाचा निषेध करण्‍यासाठी आंदोलन करण्‍यात येत आहे. यावर सुनावणीच्‍या वेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड म्‍हणाले की, रुग्‍णालयांची स्‍थिती मला ठाऊक आहे. माझ्‍या कुटुंबातील एक सदस्‍य आजारी असतांना मी स्‍वत: सरकारी रुग्‍णालयाच्‍या भूमीवर झोपलो आहे. आम्‍हाला अनेक ईमेल मिळाले आहेत, ज्‍यात डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍यावर खूप दबाव असल्‍याचे सांगितले आहे. डॉक्‍टरांनी ४८ किंवा ३६ घंटे  काम करणे चांगले नाही. आम्‍ही ते आज आमच्‍या आदेशामध्‍ये जोडू. रुग्‍ण तुमची वाट पहात आहेत. त्‍यामुळे कामावर परत या. ‘कामावर परतल्‍यानंतर तुमच्‍यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही’, असे आश्‍वासनही सरन्‍यायाधिशांनी दिले.

संपादकीय भूमिका

हा निष्‍काळजीपणा आहे कि जाणीवपूर्वक केलेले कृत्‍य आहे ?, याचे अन्‍वेषण करण्‍याचा आदेश न्‍यायालयाने सीबीआयला द्यावा, असेच जनतेला वाटते !