आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी !
बदलापूर प्रकरण !
बदलापूर – येथील ३ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीची चौकशी करायची असून अधिक अन्वेषणाची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.
बदलापूर येथील आंदोलन पूर्वनियोजित ! – पोलिसांची माहिती
बदलापूर – येथे २० ऑगस्ट या दिवशी लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सहस्रो जण सहभागी झाले होते. नागरिकांचा एक गट आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेच्या आवारात आंदोलन करत होता, तर एका गटाने रेल्वेस्थानकात घुसून रेल्वेवाहतूक १० घंटे रोखून ठेवली. पोलिसांनी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करूनही ते न थांबल्याने शेवटी सौम्य लाठीमार करून आंदोलकांना पांगवण्यात आले. हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आजपासून महाराष्ट्रात आंदोलन छेडणार ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
बदलापूर (जिल्हा ठाणे) – बदलापूर प्रकरणानंतर करण्यात आलेले आंदोलन २२ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रभर छेडण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. दानवे यांनी २१ ऑगस्ट या दिवशी बदलापूर रेल्वेस्थानकाला भेट दिली. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.
२१ ऑगस्ट या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानक येथे आंदोलनाच्या ठिकाणी अंबादास दानवे यांनी भेट दिली. या वेळी घायाळ आंदोलक महिलांशी भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची भेट घेऊन झालेल्या घटनेचा आढावा घेतला. ‘पैसे नको संरक्षण द्या’, अशी भावना या वेळी आंदोलक महिला वर्गाने दानवे यांच्याकडे व्यक्त केली. अंबादास दानवे यांनी पीडित कुटुंबियांची २० ऑगस्ट या दिवशी भेट घेतली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, हा जनआक्रोश आहे. मोठा गंभीर गुन्हा होऊनही १३ घंटे पोलीस तक्रार प्रविष्ट करत नाही, तर जनता यावर रोष व्यक्त करणारच; मात्र त्यांच्यावर लाठीमार का करता ? पोलिसांना असे करण्याची आवश्यकता नव्हती. १३ घंटे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात येत नाही हे काय राजकीय हेतूने प्रेरित आहे का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दानवे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, रेल्वे पोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रसंगी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शितल देवरुखकर शेठ, ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.
पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांना निवेदन सादर !
‘लाडक्या बहिणीहून सुरक्षित बहीण हवी यासाठी २१ ऑगस्ट या दिवशी अंबादास दानवे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महिला आघाडीच्या सर्व उपनेत्या आणि युवासेना कार्यकारिणीच्या सदस्या उपस्थित होत्या. राज्यांच्या महिला सुरक्षिततेसाठी लाडक्या बहिणीचा प्रतीकात्मक धनादेश रश्मी शुक्ला यांना देण्यासाठी आणला होता; मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही. बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि या घटनेत दिरंगाई करणारे पोलीस आणि शाळा व्यवस्थापन यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन दानवे यांनी या वेळी दिले.
२४ ऑगस्ट या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ !
बदलापूर – महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बदलापूर प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम लढवणार !
मुंबई – बदलापूर प्रकरणाचा खटला लढवण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी भाजपकडून लोकसभेची िनवडणूक लढवली असल्याचे कारण देत काँग्रेसने त्यांच्या या नियुक्तीला विरोध केला आहे.