महावितरण आस्थापनात कार्यरत असतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे (वय ४४ वर्षे) यांनी केलेले व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न !
‘श्री. नीलेश सहदेव नागरे महावितरण आस्थापन, निफाड (नाशिक) येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयात व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा प्रयत्न करतात. २१ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण श्री. नीलेश नागरे कार्यालयात करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण कर्मचारी आणि ग्राहक यांना श्री. नीलेश नागरे यांच्या कार्यालयातील खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूतींविषयी जाणून घेऊया.
या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/826576.html
५ ऐ. कार्यालयातील कर्मचारी आणि हिंदुत्वनिष्ठ ग्राहक यांचा अध्यात्माकडे कल असल्यास त्यांना साधनेविषयी सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थित रहाण्यासाठी उद्युक्त करणे : कार्यालयातील कर्मचारी किंवा काही हिंदुत्वनिष्ठ ग्राहक यांचा अध्यात्माकडे कल असेल, तर त्यांना मी ‘अध्यात्म आणि साधना’ यांविषयी सांगून त्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थित रहाण्यासाठी उद्युक्त करतो. त्यांच्यापैकी काही जणांनी गुरुपौर्णिमेच्या सेवेमध्ये सहभाग घेतला होता.
५ ओ. अनेक संप्रदायांतील लोकांशी जवळीक होणे : वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, शांतीगिरीजी महाराज संप्रदाय, शिव संप्रदाय, नरेंद्र महाराज संप्रदाय, स्वाध्याय परिवार, अशा विविध संप्रदायांतील लोक मला कार्यालयात भेटतात किंवा माझ्याशी भ्रमणभाषवर बोलतात. त्या वेळी माझ्याकडून त्यांचे काम प्राधान्याने केले जाते आणि माझी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही होते. माझी त्यांच्याशी जवळीक झाली आहे.
५ औ. महावितरणमध्ये काम करतांना वेगवेगळ्या स्तरांवर यश मिळणे आणि गुरुकृपा होऊन ६२ टक्के आध्यात्मिक पातळी (वर्ष २०२३ मध्ये) गाठता येणे : मला महावितरणमध्ये काम करतांना वेगवेगळ्या स्तरांवर यश मिळत गेले. प.पू. गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केल्यानुसार साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे केल्यावर मला पुढील वचनाची अनुभूती येते.
‘मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ।।’ – दासबोध, दशक ६, समास ७, ओवी ३६
अर्थ : मी कर्ता असे म्हणू लागल्यास कार्यसिद्धी तर होत नाहीच, उलट असे म्हणणारा ‘कार्य कसे होईल ?’, या काळजीमुळे कष्टी मात्र होतो. याउलट ‘राम कर्ता आहे’, असा दृढ निश्चय केल्याने कार्य तर सिद्धीस जाते. शिवाय यश, कीर्ती, प्रताप यांची प्राप्ती होते.
‘व्यावहारिक स्तरावर यश मिळणे आणि गुरूंना अपेक्षित अशी त्यांनीच माझ्याकडून साधना करून घेऊन मला आध्यात्मिक पातळी गाठता येणे’, हे केवळ साधना केल्यानेच शक्य झाले’, याची मला सतत अनुभूती येत असते.’
६. कर्मचारी आणि ग्राहक यांना साधकाच्या महावितरणच्या कार्यालयातील खोलीत गेल्यावर आलेल्या अनुभूती
अ. सर्व ग्राहक आणि कर्मचारी यांना माझ्या महावितरणच्या निफाड येथील सध्याच्या कार्यालयात अन् पूर्वी चांदवड, श्रीरामपूर येथील कार्यालयात आल्यावर ‘ते मंदिरात आले आहेत’, अशी अनुभूती येते.
आ. एका अभियंत्यांना कार्यालयातील माझ्या कामाच्या खोलीत आल्यावर ते ‘दत्त मंदिरात आले आहेत’, अशी अनुभूती आली.
इ. माझ्या कामाच्या खोलीत आल्यावर अनेक ग्राहकांना सात्त्विकता आणि शांती जाणवते.
ई. अनेक जणांना ‘माझ्या कार्यालयीन खोलीत बसून रहावे’, असे वाटते.
उ. ग्राहक चिडून किंवा रागावून माझ्या खोलीत आल्यास त्याने माझ्याकडे पाहिल्यावर आणि माझ्याशी चर्चा झाल्यावर ते शांत होतात.
ऊ. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे लोक माझ्या कार्यालयीन खोलीचे छायाचित्र काढतात.
ए. ‘महावितरणाच्या कार्यालयातील माझी खोली ग्राहकांना आकर्षित करून घेत आहे’, असे लक्षात येते.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुकृपेनेच माझ्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न होतात, त्याबद्दल माझ्याकडून परात्पर गुरुमाऊलींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होते. ‘हे गुरुराया, हे भगवंता, माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असेच व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न अन् आपल्याला अपेक्षित असे धर्मकार्य करून घ्या’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. नीलेश नागरे (आताची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे), नाशिक (४.५.२०२३)
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |