बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने त्वरित पावले उचलावीत !
धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी
धनबाद (झारखंड) – बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावर चालू झालेले आंदोलन आता हिंदूंच्या विरोधात गेले आहे. धर्मांध आंदोलक जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, त्यांची दुकाने लुटणे, तोडफोड करणे, मंदिरे जाळणे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. परिणामी अल्पसंख्यांक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे भारत सरकारने तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने धनबाद येथील रणधीर वर्मा चौकात झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून केली.
या आंदोलनानंतर या मागण्यांच्या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्यांकडे सोपवण्यात आले. या आंदोलनात इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरुण हिंदु, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यासह अन्य हिंदु संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.