भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने, दृश्य आणि अदृश्य विश्व हे केवळ परमात्म्याचेच स्वरूप, पिंडाला कावळा शिवणे अन् न शिवणे यांमागील अध्यात्मशास्त्र, विश्व उत्पन्न करून ते चालवणारा विधाता, ईश्वरनिर्मित वेद आणि कर्तव्याचे असणारे सामान्य ज्ञान अन् इतर पंथांचे केंद्र परमेश्वर, हिंदु धर्माचे केंद्र मनुष्य असणे आणि नवविधाभक्ती अन् त्यांचे महत्त्व’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक ३९)
या पूर्वीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/826598.html
१८. भारतियांचे निसर्गप्रेम !
धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांत आणखी काही गोष्टी विशेषत्वाने आढळतात. ‘गायीची पूजा, तुळस, वड-पिंपळाची पूजा, सूर्य-चंद्र ग्रहणांत स्नानादिक उपचार या गोष्टी लोक अंधश्रद्धेच्या आहेत’, असे समजतात. तथापि वैज्ञानिकदृष्ट्या तुळस, वड, पिंपळ या वनस्पतींची वैशिष्ट्ये; गायीत असलेले असंख्य सद्गुण आणि तिचे आध्यात्मिक महत्त्व; सूर्य-चंद्र ग्रहणांतून उत्पन्न होणारे अनेक दोष विज्ञान-सिद्ध आहेत, त्यावरील उपाय हे सर्व भारतीय संस्कृतीने लक्षात घेऊन येथील धार्मिक जीवनात अंतर्भूत केले आहेत. अशा आणखीही अनेक गोष्टी आहेत.
१९. गुरु आणि त्यांच्याकडून शिकणे !
संत एकनाथ महाराज म्हणतात –
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ।।
– एकनाथी भागवत, अध्याय ७, ओवी ३४१
अर्थ : ज्याचा जो जो गुण मी घेतला, तो मी गुरु केला; यामुळे माझे गुरु अगणित झाले. ते इतके की, सारे जग गुरूंनीच भरलेले मला दिसत आहे.
२०. गीतेचे महत्त्व
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पै संसारु जिणतें हें शस्त्र ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १५, ओवी ५७७), म्हणजे ‘खरोखरच गीता हे नुसते शब्दपांडित्याचे शास्त्र नाही, तर ही गीता संसार जिंकणारे हत्यार आहे.’ हे केवळ शब्दांचा पसारा मांडणारे शास्त्र नाही. संसारावर विजय मिळवणारे शस्त्र आहे हे !
२१. सद्गुरु महिमा !
वेद आणि सद्गुरु यांच्या विधानांविषयी भक्ती, म्हणजे श्रद्धा. आता प्रश्न असा आहे की, वेदांपेक्षा सद्गुरूंचे विधान विरुद्ध असेल तर ? कोणत्या विधानावर भक्ती असावी ? याचे उत्तर असे आहे की, अपौरुषेय, अनादि ईश्वरी वेदांच्या विरुद्ध सद्गुरु विधान करणारच नाहीत. किंबहुना तीच गुरूंच्या ‘गुरु’त्वाची परीक्षा आहे.
२२. वेदशास्त्रपुराणांवर श्रद्धा हवी !
‘वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ।।’ (तुकाराम गाथा, अभंग १४९५, ओवी १) म्हणजे ‘वेदशास्त्रपुराणांनी जे सांगितले आहे, ते ज्याला मान्य नाही, त्याचे तोंडही पाहू नका.’
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वेदशास्त्र आणि पुराणे ज्याला ‘प्रमाण’ वाटत नाहीत, त्याचे तोंड पाहू नका. मग त्याला गुरु करणे तर दूरच ! आपल्या जीवनात त्रिकालदर्शी, निःस्वार्थी, वेदैकनिष्ठ सद्गुरु लाभणे, हे जन्मोजन्मीचे भाग्य आहे.’
२३. प्रेरणामंत्र !
धर्मासाठी मरावें । मरोनि अवघ्यांसी मारावें ।
मारिता मारिता घ्यावें । राज्य आपुले ।।
अर्थ : धर्मासाठी स्वतः प्राणांचे बलीदान द्यावे, आपले प्राण देतांनाच शत्रूचेही प्राण घ्यावेत आणि शत्रूचा नाश करून आपले राज्य परत मिळवावे.
देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशय नाहीं ।।
अर्थ : देवाशी अन् देशाशी द्रोह करणारा पशू आहे. त्याला हुसकून लावावा. देवाचा दासच या जगात यशस्वी होतो, यात शंका नाही.
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।।
अर्थ : धर्मरक्षणासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी देवाला श्रेष्ठ मानून त्याचा जयजयकार करावा अन् संपूर्ण प्रांत पिंजून काढावा.
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)