Sudha Murty Raksha Bandhan : राणी कर्णावतीने हुमायूकडे साहाय्‍य मागितल्‍यापासून रक्षाबंधन चालू झाल्‍याचा केला दावा !

  • खासदार सुधा मूर्ती यांच्‍या आक्षेपार्ह पोस्‍टवरून वाद

  • सायबर पोलिसांकडे तक्रार

राज्‍यसभा सदस्‍य सुधा मूर्ती

बेंगळुरू (कर्नाटक) – राणी कर्णावती (मेवाड साम्राज्‍याची राणी) संकटात होती, तिचे राज्‍य छोटे होते आणि त्‍यावर सतत आक्रमण होत होते. तिला काय करावे हे समजले नाही. तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्‍या बहिणीप्रमाणे समजून साहाय्‍य करा’ असा संदेश पाठवला. या घटनेने राखी सणाला प्रारंभ झाला आणि तो आजतागायत चालू आहे, अशी पोस्‍ट ‘इन्‍फोसिस’ आस्‍थापनाच्‍या अध्‍यक्षा आणि राज्‍यसभा सदस्‍य सुधा मूर्ती यांनी केल्‍यावरून वाद निर्माण झाला आहे.

सामाजिक माध्‍यमांतून याला विरोध केला जात आहेत. तसेच मूर्ती यांच्‍या विरोधात अधिवक्‍त्‍या अमिता सचदेवा यांना सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

सुधा मूर्ती यांनी या पोस्‍टमध्‍ये पुढे लिहिले होते की, हुमायूला या संदेशाचा अर्थ कळला नाही. स्‍थानिकांनी त्‍याला ‘ही भावाला बहिणीची हाक’ असल्‍याचे सांगितले. ‘ही एक प्राचीन प्रथा आहे’, असे त्‍यांनी सांगितले. हुमायू म्‍हणाला, ‘मी राणी कर्णावतीला साहाय्‍य करीन’ आणि तो देहलीहून निघाला; परंतु तो वेळेत पोचू शकला नाही. तोपर्यंत राणी कर्णावतीचा मृत्‍यू झाला होता. या धाग्‍याचे महत्त्व हेच आहे की, संकटात असतांना कुणीतरी साहाय्‍याला येईल, अशी आशा ठेवण्‍याची परंपरा !

रक्षाबंधनाचा इतिहास 

भारतीय संस्‍कृतीनुसार द्रौपदीने भगवान श्रीकृष्‍णाला झालेल्‍या जखमेच्‍या वेळी स्‍वतःची साडी फाडून पट्टी बांधल्‍यापासून ही परंपरा चालू झाली. तसेच दुसर्‍या एका कथेनुसार देव आणि दानव यांच्‍यातील युद्धात पराजित देवतांना दानवांनी स्‍वर्गातून बाहेर काढले. इंद्राने बृहस्‍पतींकडे सल्ला मागितल्‍यावर त्‍यांनी विजय मिळवण्‍यासाठी श्रावण पौर्णिमेच्‍या दिवशी रक्षाविधी करण्‍यास सांगितले. गुरूंंच्‍या आदेशानुसार इंद्राणी शचीदेवीने बृहस्‍पतींकडून श्रावण पौर्णिमेच्‍या दिवशी इंद्रासाठी स्‍वस्‍तिवाचन करून इंद्राच्‍या उजव्‍या हाताला रक्षासूत्र बांधले. तेव्‍हा इंद्राने दानवांना पराभूत केले आणि स्‍वर्ग पुन्‍हा मिळवला, असा भविष्‍यात पुराणात उल्लेख आहे.