Pilot Baba : महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी उपाख्य पायलट बाबा यांचा देहत्याग
सासाराम (बिहार) – पायलट बाबा नावाने प्रसिद्ध असलेले महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी यांनी २० ऑगस्ट २०२४ या दिवशी देहत्याग केला. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. बाबांच्या देहत्यागामुळे ‘पायलट बाबा धाम आश्रमा’त, तसेच सासाराम येथील त्यांचे भक्त यांच्यामध्ये शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यापूर्वी बाबांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
पायलट बाबा भूमीखाली समाधी घ्यायचे !
पायलट बाबांचा जन्म १९३८ मध्ये बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील बिशनपुरा गावात झाला. ते योगविद्येत पारंगत होते. ते दीर्घ काळ समाधी किंवा मृत्यू सारख्या भौतिक अवस्थेत जात होते. यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांची समाधी नेहमी भूमीखालीच असायची.
महायोगी पायलट बाबांचे भारतासह जपान आणि युरोपमध्ये आश्रम आहेत. भारतात सासाराम, हरिद्वार, नैनिताल आणि उत्तरकाशी येथे त्यांचे आश्रम आहेत. बाबांनी ६ ग्रंथ लिहिले आहेत. यामध्ये ‘कैलास मानसरोवर’, ‘ज्ञानाचे मोती’, ‘हिमालयातील रहस्ये जाणून घ्या’, ‘अंतरयात्रा’, ‘हिमालय म्हणत आहे’ आणि अन्य एक ग्रंथ, यांचा समावेश आहे.