Kolkata Doctor Rape Case : आर्.जी. कर रुग्णालयाचे माजी प्रमुख डॉ. संदीप घोष यांची तब्बल ६४ घंटे चौकशी !
रुग्णालयाचे तत्कालीन उपअधीक्षक अख्तर अली यांच्याकडून घोष यांच्यावर गंभीर आरोप !
कोलकाता (बंगाल) – येथील आर्.जी. कर रुग्णालयामध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या विरोधात कोलकात्यात सातत्याने आंदोलने चालू आहेत. २१ ऑगस्टला येथील स्वास्थ्य भवनाजवळ आजपर्यंतचा सर्वांत मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहस्रावधी डॉक्टर सहभागी झाले होते. अशातच सीबीआयने या रुग्णालयाचे माजी प्रमुख प्रा. संदीप घोष यांची तब्बल ६४ घंटे चौकशी केली. या सगळ्यातच गेल्या वर्षी घोष यांच्या विरोधात गंभीर आरोप केलेले आर्.जी. कर रुग्णालयाचे तत्कालीन माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी घोष यांच्यावर नव्याने गंभीर आरोप केले आहेत. अली म्हणाले की, संदीप घोष बेवारस मृतदेहांच्या विक्रीसह अनेक अवैध कामांमध्ये सहभागी होते. वर्ष २०२३ पर्यंत रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा आणि वैद्यकीय उपकरणांची तस्करी करण्यात घोष गुंतले होते. राज्य दक्षता आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तपासात घोष दोषी आढळूनही त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. (हा आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा कारभार ! – संपादक)
महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ डॉ. घोष यांनी आर्.जी. कर रुग्णालयातील स्वतःच्या पदाचे त्यागपत्र दिले. त्यानंतर काही घंट्यांतच कोलकाता वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली. कोलकाता उच्च न्यायालयाने यासंदर्भात सरकारला फटकारले आणि घोष यांना अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवले.
अख्तर अली यांनी दावा केला की,
१. डॉ. घोष यांच्याविरुद्ध तपास अहवाल सादर केल्यामुळे त्याच दिवशी स्थानांतर !
अख्तर अली यांनी डॉ. घोष यांच्याविरुद्धचा तपास अहवाल राज्याचा आरोग्य विभाग, बंगालचे राज्यपाल, तसेच राष्ट्रपती यांच्याकडेही पाठवला होता; परंतु आरोग्य विभागाने त्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर अली यांचेच रुग्णालयातून स्थानांतर करण्यात आले. अली म्हणाले की, ज्या दिवशी मी तपास अहवाल सादर केला, त्याच दिवशी माझे स्थानांतर करण्यात आले. चौकशी समितीतील अन्य दोन सदस्यांचेही स्थानांतर करण्यात आले. घोष यांच्यापासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी मी माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले; पण मी अपयशी ठरलो.
२. विद्यार्थ्यांकडून घेत होते लाच !
वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी घोष लाच मागायचे. महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण करण्यात आले.
३. रुग्णालयाच्या विश्रामगृहात वेश्याव्यवसाय ?
रुग्णालयाच्या विश्रामगृहात (‘गेस्ट हाऊस’मध्ये) काही वेश्यांना आणले जात होते. मी स्वत: याची शहानिशा केली होती. मी तेथे सी.सी.टी.व्ही. बसवून घेतले; परंतु कालांतराने ते काढल्याचेही माझ्या निदर्शनास आले. तेथे रात्रपाळी करण्यासाठी माझ्यापेक्षा कनिष्ठ उपअधीक्षकांच्या रहाण्यासाठी सोय असायची; परंतु जेव्हा अशा प्रकारे बाहेरून मुली आणल्या जाऊ लागल्या, तेव्हापासून उपअधीक्षकांना रहाण्यासाठी नाकारण्यात आले.
डॉ. घोष यांच्या विरोधात आवाज उठवल्याने जीविताला धोका !अख्तर अली यांनी डॉ. संदीप घोष यांच्या विरोधात गेल्या वर्षी गंभीर आरोप केल्यानंतर त्यांचे केवळ स्थानांतरच नाही, तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. ते म्हणाले की, माझ्या मुलीच्या भ्रमणभाषवरही धमक्या येऊ लागल्या. माझे कुटुंबाला आधी सुरक्षित राहिले पाहिजे. मी आता एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अली यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. |