Hindu Professors Forced To Resign : हिंदु प्राध्यापकांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार अद्यापही चालूच !

त्यागपत्र देण्यास भाग पाडलेले प्राध्यापक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन होऊनही हिंदूंवरील अत्याचार संपलेले नाहीत. उलट आता त्यांनी संस्थांमध्ये काम करणार्‍या आणि वर्षानुवर्षे त्या संस्थेसाठी सेवा बजावणार्‍या हिंदूंना लक्ष्य करायला प्रारंभ केला आहे. या क्रमाने काही ठिकाणी मुसलमान विद्यार्थीच त्यांच्या हिंदु शिक्षकांना त्रास देत असून त्यांना त्यागपत्र द्यायला भाग पाडत आहेत, तर काही ठिकाणी सरकारी अधिकार्‍यांच्या त्यागपत्रावर स्वाक्षर्‍या घेतल्या जात आहेत.

१. बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी ‘एक्स’वर माहिती दिली की, गौतम चंद्र पाल अजीमपूर सरकारी महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे  सर्वोत्तम शिक्षक होते; परंतु मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले.

२. सोनाली राणी दास नावाच्या एका हिंदु महिलेवर ‘होली रेड क्रिसेंट नर्सिंग कॉलेज’मधील साहाय्यक प्राध्यापिकेची नोकरी सोडण्यासाठी दबाव आणला. यासाठी विद्यार्थ्यांनी तिला खोलीत कोंडून ठेवले होते. सोनाली दास यांनी सांगितले की, माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्यासमवेत असे केले, यावर माझा विश्‍वास बसत नाही. मी शिकवलेले अनेक विद्यार्थी अजूनही माझ्या संपर्कात आहेत; पण जे घडले, त्यावर विश्‍वास बसत नव्हता. हे लोक आम्हाला सोडणार नाहीत.

३. एका ५५ वर्षीय महिला शिक्षिकेने सांगितले की, तिची परिस्थिती अशी होती की, तिला खिडकीतून बाहेर उडी मारून जीव वाचवावा लागला. मुसलमान विद्यार्थी तिला ‘काफीर’ म्हणत होते.

४. खुकू राणी बिस्वास या ‘जेसोर नर्सिंग इन्स्टिट्यूट’च्या प्रमुख होत्या. त्यांना त्यांच्या कार्यालयात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांनी ५ घंटे घेराव घातला होता. या वेळी त्यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली.

५. खुल्ना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु मिहिर रंजन हलदर यांना १२ ऑगस्ट या दिवशी त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले. याची माहिती ‘एक्स’वरून देण्यात आली.

६. चंदपूर येथील पुरणबाजार पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य रतनकुमार मजुमदार यांनाही त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले.

७. काही मुसलमान विद्यार्थ्यांनी सौमित्र शेखर या कुलगुरूंना त्यागपत्र देण्यास भाग पाडले. सौमित्र शेखर बांगलादेशातील मोयमोनसिंघा जिल्ह्यातील काझी नजरुल इस्लाम विद्यापिठाचे कुलगुरु होते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील स्थिती पहाता हिंदू पूर्णपणे संपेपर्यंत हेच घडणार आहे, असे दिसते. त्यामुळे भारतासह जभगरातील हिंदूंनी अशा गोष्टी पहाण्याची सवय केली पाहिजे; कारण ते ही स्थिती पालटण्यासाठी इच्छुक नाहीत !