हणजूण-वागातोर येथील ५ नाईट क्लबांच्या विरोधात गुन्हे नोंद
ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी काढलेल्या मेणबत्ती मोर्चानंतर पोलिसांची कारवाई
पणजी, २० ऑगस्ट (वार्ता.) – हणजूण पोलिसांनी हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीतील ५ नाईट क्लबांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट केले आहेत. १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई झालेली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी सतत ४ दिवस काढलेल्या मेणबत्ती मोर्चाची ही फलनिष्पत्ती असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
१४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत हणजूण-वागातोर या भागांत अनेक ‘नाईट क्लब’नी नियमाचे उल्लंघन करून ‘रात्री १० वाजल्यानंतरही संगीत असेल’, अशी हमी देणारी ‘ऑनलाईन’ मोहीम आरंभली होती. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही मोहीम राबवली होती. या वेळी स्थानिकांनी १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात ठिकठिकाणी मेणबत्ती मोर्चाचे आयोजन केले आणि याद्वारे ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी वागातोर येथील ‘नोह क्लब’, ‘पप्पी चलो’ आणि ‘थलासा क्लीफ’, तसेच हणजूण येथील ‘पायरेट्स कॅफे’ आणि हडफडे येथील ‘ब्रीच ऑफ रोमियो लेन’ या ५ नाईट क्लबांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. याविषयी अधिक माहिती देतांना पोलिसांनी सांगितले, ‘‘ध्वनीप्रदूषण प्रकरणी प्रथम संबंधित ‘डीजे’च्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि त्याच्याकडील ‘मिक्सर’ आणि ‘स्पीकर’ हे महागडे साहित्य कह्यात घेण्यात आले आहे. यासंबंधी अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर संबंधित आस्थापनांच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाणार आहे.’’ ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिलेल्या निर्देशाचे पालन होत आहे कि नाही हे पडताळण्यासाठी १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत पोलीस आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकार्यांनी गस्त घातली.
ध्वनीप्रदूषणाच्या विरोधातील आंदोलनाविषयी माहिती देतांना डेस्मंड आल्वारीस म्हणाले, ‘‘स्थानिकांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अन्यथा चित्र वेगळे असते. हणजूण-वागातोर या समुद्रकिनारपट्टीत सुमारे ७५ क्लब आणि रेस्टॉरंट (उपाहारगृहे) आहेत; मात्र पोलिसांनी केवळ ५ क्लबांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. पोलिसांचा कारवाईचा आकडा नगण्य आहे. या भागात ध्वनीप्रदूषण करणारे अनेक कुप्रसिद्ध आणि प्रभावी क्लब आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.’’