उत्तम आरोग्यासाठी विरुद्ध आहार टाळा !
‘विरुद्ध आहार’ ही एक वेगळी संकल्पना आहे. अगदी थोडक्यात सांगायचे, तर असे पदार्थ जे एकमेकांसह खाल्ले, तर आरोग्याला घातक असतात. सध्याच्या काळात बर्याचदा स्वतःच्या आहारात आढळणार्या विरुद्ध आहाराची सूची येथे देत आहे. उत्तम आरोग्याची इच्छा असल्यास हे पदार्थ टाळणे इष्ट !
१. दूध + फळ/मीठ/मांस/मासे/आंबट असे एकत्र वा लगेच मागे-पुढे खाणे.
२. वरण भात + दूध
३. दूध घातलेला चहा + चपाती/भाकरी/बिस्कीट
४. चहासमवेतच नाश्ता (न्याहारी) करणे
५. मिल्कशेक वा केळ्याचे दुधातील शिकरण
६. दही, तसेच मध गरम करणे वा गरम पदार्थांवर ते घेणे
७. तूप + मध हे मिश्रण समप्रमाणात घेणे
८. विशेषतः पंजाबी भाज्या वगैरे सिद्ध करतांना त्यात दूध किंवा क्रीम इत्यादी घालणे
९. भाज्यांचे ब्लांचिंग करणे (ब्लांचिंग म्हणजे तंतुमय भाज्या किंवा फळांचा रंग, पोत आणि पोषक तत्त्व टिकवून ठेवण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे.)
१०. तूप वा तळलेले पदार्थ खाल्ल्यावर थंड पाणी पिणे
११. शिळे पदार्थ खाणे
१२. फ्रीजचा (शीतकपाटाचा) अवाजवी वापर (विशेषतः मळलेली कणिक वा शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवून वापरण्याची पद्धत)
१३. जेवतांना दूध घातलेले खिरीसारखे गोड पदार्थही शक्यतो टाळणे इष्ट.
बहुतेक ठिकाणी दुधाचा पर्याय म्हणून नारळाच्या दुधासारखे कोणतेही वनस्पतीजन्य दूध वापरता येईल. कढी, पंचामृत हे पदार्थ विरुद्ध नाहीत. निरोगी रहाण्याची इच्छा असलेल्या सूज्ञ व्यक्तींनी वरील संयोग अधिकाधिक टाळण्याचा प्रयत्न करावा. अशा संयोगांचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो, हे संशोधनाअंतीही सिद्ध झाले आहे. मात्रा, कालावधी, ऋतू, व्यायाम हे यांत महत्त्वाचे घटक आहेत. नियमित व्यायाम करणार्या व्यक्तींच्या आहारात क्वचित् वरील घटकांचे सेवन झाले, तरी त्यांना ते तितकेसे बाधत नसल्याचे आयुर्वेद नमूद करतो. वरील संयोग वगळता खाण्याजोगे पदार्थच पुष्कळ मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे ‘खायचे तरी काय ?’, हा प्रश्न निकाली निघतो.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (१०.८.२०२४)
‘केळ्याचे दुधातील शिकरण’, हा आयुर्वेदानुसार विरुद्ध आहारच !‘केळ्याचे दुधातील शिकरण’, हा महाराष्ट्रातील एक लाडका पदार्थ. खरे तर कोकणातील मूळ पाककृतीत नारळाचा रस आणि केळ हे मिश्रण होते. त्यात प्राण्याचे दूध हा कदाचित नारळ सहज न मिळणार्या भागात घालण्याची पद्धत चालू झाली असावी. त्यातच नारळाचे दूध काढण्यापेक्षा हे सोपे असल्याने मूळ पाककृती मागे पडत गेली आणि हाच पदार्थ घराघरांत रूढ झाला; पण दूध + फळ हा आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार होतो. ‘सलग २८ दिवस हा आहार केलेल्या प्राण्यांमध्ये यकृत आणि किडनीच नव्हे, तर हृदयावरही परिणाम झालेले आढळून आले’, असे संशोधन झालेले आहे. आता प्रतिदिन कुणी शिकरण खाते का ? हो ! मी पाहिले आहेत असे रुग्ण. विरुद्ध आहार ही संकल्पनाच माहिती नसलेले लोक प्रतिदिन एकच अपथ्य नाही केले, तरी भिन्न भिन्न अपथ्य करत असतीलच की ! – वैद्य परीक्षित शेवडे (१४.८.२०२४) |