फोन ‘स्मार्ट’, माणसाचे काय ?

एका सामाजिक माध्यमावर ‘स्मार्टफोन’च्या दुष्परिणामांविषयीचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात सांगितले आहे की, हा स्मार्टफोन उगाच जाडजूड झाला नाही (म्हणजे त्याचे महत्त्व उगाच वाढले नाही), तर त्याने आपल्या अनेक गोष्टी खाल्ल्या आहेत. स्मार्टफोनने आपल्या हातावरचे घड्याळ खाल्ले आहे, तसेच विजेरी (टॉर्च), चिठ्ठी, पत्रे, पुस्तके, रेडिओ, टेपरेकॉर्डर, कॅमेरा, गणकयंत्र एवढे सगळे खाल्ले आहे. याखेरीज शेजारच्यांशी मैत्री, मिळून मिसळून रहाणे, वेळ, पैसे, नाती, मनःशांती, स्मरणशक्ती, आरोग्य हेही त्याने गिळंकृत केले आहे. या पालटणार्‍या युगाचा असा परिणाम झाला आहे की, माणूस ‘वेडा’ आणि फोन ‘स्मार्ट’ झाला आहे ! जोपर्यंत दूरभाष वायरने बांधलेला असायचा, तोपर्यंत माणूस स्वतंत्र होता. आता भ्रमणभाष स्वतंत्र झाला आहे, तर माणूस त्याने बांधला गेला आहे ! सध्या (भ्रमणभाषवरूनच संदेश पाठवून) माणसाच्या बोटांनी नाती जपली जात आहेत. जिभेने जपायला (संवाद साधायला) वेळ कुठे आहे ? सगळे स्मार्टफोन वरून ‘टच’मध्ये (संपर्कात) रहातात; पण खरे ‘टच’मध्ये तर कुणीच नाही (म्हणजे जवळीक नाही !). खरंच या स्मार्टफोनमुळे स्वतःचे आयुष्य पूर्णच पालटून गेले आहे.

आजचे युग हे स्मार्टफोन आणि इंटरनेट यांचे आहे. ‘आजच्या पिढीला सामाजिक माध्यमांचे वेड लागले आहे’, असे म्हटले जात आहे. अगदी सराईतपणे लहान-मोठे, शहरी-ग्रामीण, शिक्षित-अल्पशिक्षित व्यक्तीही सामाजिक माध्यमांचा वापर करतांना दिसतात. पूर्वी सकाळी उठल्यावर हातात वर्तमानपत्र हवे असायचे, त्याविना दिवसाचा आरंभ होत नसे. आता सकाळी उठल्यावर स्मार्टफोनविना पर्याय नसतो. उठल्या उठल्या फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांवर एखादा फेरफटका मारल्याविना दिन ‘शुभ’ होत नाही ! वर्ष-दीड वर्षाचे मूलही भ्रमणभाषविना जेवत नाही. एखाद्या मोठ्या माणसालाही नसेल, तेवढे ५ वर्षांच्या मुलाला ‘स्मार्टफोन’मधील ज्ञान असते ! आईने, आजीने मुलांना कथा-कहाण्या वाचून दाखवाव्यात, मुलांनी त्यावर कुतूहलाने अनेक प्रश्न विचारावेत, पुन्हा त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नवीन पुस्तके वाचावीत, हे चित्र कालबाह्य होत चाललेले दिसते. गोष्टींची पुस्तके वाचण्याऐवजी त्याची जागा व्हिडिओ आणि ‘ॲनिमेटेड फिल्म्स’ने घेतलेली दिसते. सामाजिक माध्यमांमुळे वाचन संस्कृतीचा होत चाललेला र्‍हास आपल्याला जाणवतो.

सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, कला, वैचारिक आणि वैज्ञानिक शास्त्रे यांविषयी वाचन करून विचार करायला लावणार्‍या ‘वाचन संस्कृती’ची जागा सामाजिक माध्यमांनी घेतली आहे. संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमामुळे माणसाने असंवेदशील बनू नये आणि मानवी जीवनातील अमूल्य क्षण वाया घालवू नयेत, एवढीच अपेक्षा आहे !

– सौ. प्रज्ञा जोशी, सनातन संकुल, देवद, पनवेल.