अखेर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’द्वारे शैक्षणिक साहित्य मिळणार !
(डीबीटी म्हणजे ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’, म्हणजे पैसे थेट खात्यात जमा होणे)
श्री. विजय भोर, नवी मुंबई
नवी मुंबई, १९ ऑगस्ट – महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ‘डीबीटी’द्वारे आणि गणवेश ठेकेदाराकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये गणवेशासाठी २८ कोटी रुपयांचे आणि शैक्षणिक साहित्यासाठी १२ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते; मात्र प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे शाळा चालू होऊन २ महिने झाले, तरी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले नाही. मागील शैक्षणिक वर्षातील गणवेश हे शैक्षणिक वर्ष संपतांना फेब्रुवारी २०२४ या महिन्यामध्ये देण्यात आले होते. केवळ मार्च आणि एप्रिल हे दोन महिनेच मागील वर्षी विद्यार्थ्यांनी गणवेश घातले होते. त्यामुळे या वर्षी शाळा चालू झाल्यापासून बहुतांश विद्यार्थी गणवेशात दिसत आहेत. या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा आणि त्यानंतर पुढच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा आचारसंहितेमध्ये गणवेशाचे कंत्राट अडकायला नको, यासाठी मे महिन्यामध्येच पुढील दोन वर्षांकरिता गणवेश उपलब्ध करून देण्याचे कंत्राट काढण्यात आले होते. हे कंत्राट अंतिम झाले असून संबंधित ठेकेदाराला गणवेश पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
मागील वर्षी शैक्षणिक साहित्य मात्र मिळाले नव्हते. हे शैक्षणिक साहित्य हे ई-रूपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात पहिल्या महिन्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु तांत्रिक कारणामुळे हे शक्य झाले नाही. अखेर हे शैक्षणिक साहित्य ‘डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये हे साहित्य प्रथम विद्यार्थ्यांनी खरेदी करून त्याची देयके शिक्षकांकडून प्रशासनाला पाठवल्यावर प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम पाठवण्यात येणार आहे. या वर्षी ५० सहस्र विद्यार्थ्यांना वह्या, रेनकोट, बूट-मोजे, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळणार आहे.