भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म, हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने, दृश्य आणि अदृश्य विश्व हे केवळ परमात्म्याचेच स्वरूप, पिंडाला कावळा शिवणे अन् न शिवणे यांमागील अध्यात्मशास्त्र, विश्व उत्पन्न करून ते चालवणारा विधाता आणि ईश्वरनिर्मित वेद अन् कर्तव्याचे असणारे सामान्य ज्ञान, धर्माचे द्वैविध्य : प्रवृत्ती आणि निवृत्ती, इतर पंथांचे केंद्र परमेश्वर, तर हिंदु धर्माचे केंद्र मनुष्य असणे अन् ज्ञानी असण्याचे लक्षण’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ३८) – प्रकरण ६
मागील भाग वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/826031.html
१४. भक्ती आणि कर्तव्याचरण !
महर्षि नारदमुनी भक्तीसूत्रात म्हणतात –
हरेर्नामैव नामैव नामैव मम जीवनम् ।
कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा ।।
– नारदपुराण, पूर्वखण्ड, पाद १, अध्याय ४१, श्लोक ११५
अर्थ : भगवंताचे नाम हेच माझे जीवन आहे, अशी अवस्था प्राप्त झाल्याविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही.
हरीचे नामस्मरण हेच केवळ कलियुगात आत्मोन्नतीचे साधन आहे. त्याविना दुसरा मार्ग मुळीच नाही. इतके नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे महर्षि नारद त्याच्या वरच्या श्लोकात मात्र स्वकर्तव्यविरहित नामस्मरणाची निंदा करतात. हाच भारतीय संस्कृतीतील भक्तीयोग आहे. नारदमुनीच म्हणतात, ‘लोके वेदेषु तदनुकूलाचरणम् ।’ (नारदभक्तिसूत्र, सूत्र ११) म्हणजे ‘लोक आणि वेद यांमध्ये जे भक्तीला अनुकूल असेल, असेच आचरण करणे’, म्हणजे लौकिक अन् वैदिक कर्मे करतांना ईश्वराला आवडतील, अशीच कर्मे करणे, म्हणजे भक्ती ! आचरण हीच भक्ती होय. ईश्वरानुकूल आचरण म्हणजे भक्ती ! प्रतिकूल आचरण म्हणजे पाप होय; मात्र केवळ कर्तव्याचरण हे पापही नाही आणि पुण्यही नाही.
मी माझ्या पत्नीसाठी लुगडे आणले, तर ते पुण्य आहे का ? मी माझ्या मुलांसाठी खेळणी आणली, तर ते पुण्य आहे का ? मी माझ्या आईची सेवा केली, तर ते पुण्य आहे का ?; पण ‘मी कर्तव्य पार न पाडणे, हे पाप निश्चित आहे’, अशी ही भारतीय धारणा आहे.
१५. धनगराच्या माध्यमातून श्रीकृष्णाने दर्शन देणे आणि संत सूरदासांनी त्याचे खरे रूप ओळखणे
सामान्य माणसासाठी अगदी सोपा भक्तीमार्गही सांगितला आहे. अंध भगवद्भक्त संत सूरदास एकदा रानातून जातांना वाट चुकले. चालता चालता समोर एक खड्डा आला. ते पडणार, तोच एका धनगराच्या मुलाने त्यांचा हात धरला. तो म्हणाला, ‘‘काका, इकडून या. तिकडे खड्डा आहे.’’ त्याने त्यांना मार्गावर आणले, तेव्हा सूरदास त्याचा हात घट्ट धरून त्याला म्हणाले, ‘मी कधीचा तुला शोधत होतो. कृष्णा, आता बरा सापडलास.’ खरंच तो श्रीकृष्णच होता. त्याने हात हिसकावून घेऊन म्हटले, ‘‘मला ‘कृष्णा’, ‘कृष्णा’ काय म्हणताय ? मी धनगराचा मुलगा आहे.’’ संत सूरदास म्हणाले, ‘‘मी तुला चांगला ओळखतो.’’
हस्तमुक्षिप्य यातोऽसि बलात्कृष्ण किमद्भुतम् ।
हृदयाद्यदिनिर्यासि पौरुषं गणयामि ते ।।
अर्थ : हाताला झटका देऊन पळालास, कृष्णा, यात काय मोठा पराक्रम केलास ? माझ्या हृदयातून निघून दाखव, तर समजेन, तुझ्यात काही पुरुषार्थ आहे म्हणून !
‘सांठविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ।।’ (जगद्गुरु संत तुकाराम महाराज), म्हणजे ‘ज्यांनी या हरिला आपल्या हृदयरूपी मंदिरात आत्मतत्त्वाने साठवले आहे’, या हृदयमंदिरातून हरिला सुटका करून घेता येणे शक्य नाही.
१६. नवविधाभक्ती आणि त्यांचे महत्त्व
श्रीमद्भागवतात नवविधाभक्तीचे वर्णन आहे, ‘श्रवणं, कीर्तनं, विष्णो:स्मरणम्, पादसेवनम्, अर्चनम्, वंदनम्, दास्यम्, सख्यम्, आत्मनिवेदनम् ।’
१. श्रवणम् : भगवंताच्या गुणानुवादांचे श्रवण करणे.
२. कीर्तनम् : भगवंताच्या सगुण चरित्राचे गुणगान वर्णन करणे.
३. विष्णोः स्मरणम् : भगवान् परब्रह्म परमात्म्याचे नित्य स्मरण करणे.
४. पादसेवनम् : भगवंताच्या चरणारविंदाची सेवा करणे.
५. अर्चनम् : भगवंताची विविध उपचारयुक्त पूजा करणे.
६. वंदनम् : भगवंताला अंतःकरणपूर्वक सदैव नमस्कार करणे.
७. दास्यम् : भगवंताचे दास समजून स्वतः त्याची सेवा करणे.
८. सख्यम् : अर्जुनाप्रमाणे भगवंताशी लाडिकपणे मित्रता जमवणे.
९. आत्मनिवेदनम् : स्वतःला सर्वस्वाने श्रीचरणी समर्पित वैराग्य करणे.
१७. वैराग्य आणि आत्मोन्नती !
कर्म, भक्ती, ज्ञान इत्यादी मार्गांचे मूळ आहे वैराग्य ! वैराग्य म्हणजे घरदार सोडून रानावनात जाणे नव्हे. विषयांपासून मन परावृत्त करणे आणि साधे, निर्मळ, निर्लोभी जीवन जगणे, अशा वासनारहित वृत्तीला ‘वैराग्य’ म्हणतात. निष्काम कर्मयोग हाही वैराग्याचाच प्रयोग आहे. ‘वैराग्याविना आत्मोन्नती संभवत नाही’, असे भारतीय धार्मिक तत्त्वज्ञान प्रामुख्याने आणि आग्रहाने सांगते.
(क्रमश:)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार: ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/826973.html