Pakistan Shaheen-2 : पाकिस्तानकडून ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

 पाकिस्तानचे आण्विक क्षेपणास्त्र ‘शाहीन-२’

इस्लामाबाद – पाकिस्तानने ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्यदलाची प्रसारमाध्यम शाखा ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने (आय.एस्.पी.आर्.ने) नुकतीच ही माहिती दिली. ‘आय.एस्.पी.आर्.’च्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानने भूमीवरून भूमीवर मारा करणार्‍या ‘शाहीन-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या प्रसंगी पाकिस्तानी सैन्यदलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे आण्विक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्येच विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकचे क्षेपणास्त्र चेन्नईपर्यंत करू शकते मारा

हे क्षेपणास्त्र २ सहस्र २०० किमीपर्यंत मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानातील लाहोरपासून ते दक्षिण भारतातील चेन्नईपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या सैन्यदलाने विकसित केलेले ‘शाहीन-२’ हे क्षेपणास्त्र ‘प्रगत नेव्हिगेशन, ‘पोस्ट सेपरेशन एटिट्यूड करेक्शन’ आणि ‘ए.बी.एम्.’ काऊंटरमेझर्स’सह प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे. ‘शाहीन-२’ अनेक प्रकारची शस्त्रे वाहून नेऊ शकते.