गुरुदेवांप्रती अपार भाव असणारी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव) येथील कै. (कु.) श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १८ वर्षे) !
(‘वर्ष २०२१ मध्ये ‘कु. श्रुती हलगेकर हिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती. २३.७.२०२४ या दिवशी तिचे निधन झाले असून आता तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के झाली आहे.’ – संकलक)
‘२३.७.२०२४ या दिवशी दुपारी कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर (वय १८ वर्षे) हिचे निधन झाले. २१.८.२०२४ या दिवशी तिचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये अन् तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. लक्ष्मी हलगेकर (कु. श्रुतीची आई), नंदीहळ्ळी (जिल्हा बेळगाव)
‘कु. श्रुती मतिमंद होती. तिची ४ वर्षांपूर्वी आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती. मागील ३ वर्षांमध्ये तिच्यामध्ये पालट झाले.
१ अ. भावावस्थेत आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे : श्रुतीला चालता, बोलता किंवा बसता येत नव्हते. ती झोपूनच असे. तिच्या चेहर्यावरील चैतन्य वाढले होते. ती सतत भावावस्थेत असे. ती सतत गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अनुसंधानात होती. आम्ही मोठ्याने ‘गुरुदेव’ असे म्हटल्यावर ती मोठ्या आवाजात हसत असे. मी जितक्या वेळा ‘गुरुदेव’ असे म्हणत असे, तेवढ्या वेळा ती आनंदाने हसत असे. भक्तीसत्संग ऐकतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।’ (अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म (ईश्वराचा ईश्वर) आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.) हा श्लोक म्हणत असतांना श्रुती लक्षपूर्वक ऐकत असे आणि त्यांना प्रतिसाद देत तोंड हलवत असे. भक्तीसत्संगातील भावगीते ऐकून तिची भावजागृती होत असे. तिच्या डोळ्यांतून अश्रू येत असत.
१ आ. गुरुदेवांना प्रार्थना करणे, तसेच नामजपादी उपाय आणि औषधोपचार यांमुळे श्रुतीचा त्रास न्यून होणे : ६ मासांपूर्वी श्रुतीचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले. तिचे त्रास बघून आम्हाला पुष्कळ वाईट वाटत असे. मी गुरुदेवांकडे ‘तिला त्रास सहन करण्याची क्षमता द्या’, अशी सतत प्रार्थना करत होते. मी गुरुदेवांना ‘श्रुतीला सतत तुमच्या चरणांजवळ ठेवा’, असे आळवत होते. नंतर नामजपादी उपाय आणि औषधे यांनी तिचा त्रास न्यून झाला.
१ इ. समंजस : पूर्वी ‘आम्ही श्रुतीला उचलून घ्यावे’, असे तिला वाटत असे. आम्ही तिला थोडा वेळ उचलून घेतल्यानंतर ती शांत होत असे. अलीकडे ती आम्हाला कोणताही त्रास देत नव्हती. मी तिला मांडीवर घेतल्यावर तिला आनंद होऊन ती हसत असे. तिला दिवसभर घरात राहून कंटाळा येतो; म्हणून मी कधी कधी तिला खांद्यावर घेऊन बाहेर फिरवत असे. तेव्हा तिला मोकळ्या हवेत आल्यामुळे पुष्कळ आनंद होत असे.
१ ई. भ्रमणभाषवर लावलेला नामजप, भजने, भावगीते किंवा स्तोत्रे ऐकून प्रतिसाद देणे आणि श्रुतीचा अंतर्मनातून नामजप चालू असणे : आम्ही भ्रमणभाषवर नामजप, भजने, भावगीते किंवा स्तोत्रे लावली असता श्रुती आनंदी होऊन प्रतिसाद देत असे. भ्रमणभाषवरील भजने आणि नामजप ऐकून श्रुती ते म्हणण्याचा प्रयत्न करत असे. ती हाताच्या पाचही बोटांच्या वेगवेगळ्या मुद्रा करत असे. ती हाताच्या बोटांनी माळ ओढून नामजप केल्याप्रमाणे बोटांची हालचाल करत असे. ती तोंडाने नामजप केल्याप्रमाणे तोंडाची हालचालही करत असे. ‘तिचा नामजप अंतर्मनातून चालू आहे’, असे आम्हाला वाटत असे.
१ उ. साधक, संत आणि सद्गुरु यांच्याप्रती भाव : माझ्या भ्रमणभाषची ‘रिंगटोन’ (टीप) ‘गुरु की सेवा, गुरु की कृपा’ ही ओळ आहे. हे भक्तीगीत गायलेल्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा आवाज श्रुती लगेच ओळखत असे. तिला भ्रमणभाषवरील साधकांचा आवाज ऐकून आनंद होत असे. मला उत्तरदायी साधकांचा भ्रमणभाष आल्यास त्यांचा आवाज ऐकून श्रुती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. आम्ही संतांचे मार्गदर्शन ‘ऑनलाईन’ ऐकत असतांना श्रुती पू. शंकर गुंजेकर (५६ वे संत, वय ६१ वर्षे) आणि पू. रमानंद गौडा (७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांचा आवाज सहज ओळखत असे. ती त्यांना प्रतिसाद देत असे. ती सद्गुरु स्वाती खाडये यांचा आवाज ऐकून त्यांना प्रतिसाद द्यायची. (टीप : बाहेरील व्यक्तीचा भ्रमणभाष आला आहे, हे सूचित करणारा आवाज)
१ ऊ. ‘गुरुदेवांनी दैवी बालकरूपी प्रसाद दिला आहे’, असा भाव ठेवून श्रुतीचे संगोपन करणे : माझा स्वभाव फार चिडचिडा आहे; पण श्रुतीच्या संदर्भात माझी कधी चिडचिड झाली नाही किंवा तिचा मला त्रास वाटला नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल कधी विकल्प आला नाही. तिला पहाताक्षणी मला प.पू. गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत असे. ‘त्यांनी मला दैवी बालकरूपी प्रसाद दिला आहे’, असे वाटून माझा भाव जागृत होत असे. मला ‘तिच्या चैतन्यमय चेहर्याकडे पहातच रहावे’, असे वाटत असे.’
२. श्री. सिद्धाप्पा (बाळू) हलगेकर (श्रुतीचे वडील), नंदीहळ्ळी, जिल्हा बेळगाव.
२ अ. प.पू. गुरुदेवांनी श्रुतीची सेवा करतांना ‘संतसेवा करत आहोत’, असा भाव ठेवण्यास सांगणे : ‘एकदा मी प.पू. गुरुदेवांना श्रुतीविषयी सांगितले. त्या वेळी त्यांनी मला जवळ घेतले आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, ‘‘श्रुतीच्या वयाच्या १८ व्या वर्षांनंतर सर्वकाही ठीक होईल. चिंता करू नका. तुम्ही श्रुतीची सेवा ‘संतसेवा किंवा श्रीकृष्णाची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवून करा. मागील जन्मात तिने तुमची सेवा केली होती; म्हणून तुम्ही आता तिची सेवा करायची आहे. असा तुमचा देवाण-घेवाण हिशोब आहे.’’
२ आ. ८.२.२०२४ या दिवशी श्रुतीचा तिथीनुसार वाढदिवस होता. त्या दिवशी तिचा चेहरा पुष्कळ तेजस्वी आणि चैतन्यमय दिसत होता. ती दिवसभर पुष्कळ आनंदी होती.
२ इ. श्रुतीच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘ती गुरुदेवांच्या समवेत आणि भावस्थितीत आहे’, असे वाटणे : श्रुतीच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘ती गुरुदेवांच्या समवेत आहे आणि तिचा वाढदिवस साजरा करायला गुरुदेवही सूक्ष्मातून आले आहेत’, असे मला वाटत होते. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या घरी शेजारी रहाणारी लहान मुले आली होती. त्यांना पाहून श्रुतीला पुष्कळ आनंद झाला. ती दिवसभर भावस्थितीतच होती. ‘तिचा १८ वा वाढदिवस पुष्कळ सात्त्विक वातावरणात झाला’, असे मला वाटले. घरातील व्यक्ती ‘श्रुतीचा चेहरा उजळला आहे’, असे सांगत होते.’
२ ई. तापाचे निमित्त होऊन श्रुतीची प्राणज्योत मालवणे : २०.७.२०२४ या दिवशी श्रुतीला थोडा ताप आला; म्हणून गावातीलच डॉक्टरकडे नेऊन तिच्यावर औषधोपचार केले. २२ जुलैला दिवसभर श्रुती चांगलीच होती; पण नंतर दुसर्या दिवशी तिला ताप आला आणि पुष्कळ त्रास होऊ लागला. तेव्हा औषधोपचार आणि नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यावर तिचा त्रास थोडा न्यून झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात नेत असतांना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
३ आ. सौ. अर्चना सुनील घनवट (साधिका), बेळगाव
३ आ १. श्रुतीच्या घरी आलेल्या व्यक्तींनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर वातावरणात हलकेपणा जाणवणे : ‘श्रुतीचे निधन झाल्यावर आम्ही काही जण तिच्या आई-वडिलांना भेटायला गेलो होतो. त्या दिवशी श्रुतीचे नातेवाईक आणि तिच्या घराशेजारी रहाणार्या व्यक्ती श्रुतीच्या आई-वडिलांना भेटायला आल्या होत्या. ते सर्व जण पुष्कळ रडत होते. तेव्हा मला वातावरणात दाब जाणवत होता. त्या वेळी माझ्या मनात ‘सर्वांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व सांगूया’, असा विचार आला. मी सर्वांना हा नामजप करायला सांगितला. तेव्हा सर्व जण नामजप करू लागले. नंतर अर्ध्या घंट्याने वातावरणातील दाब न्यून होऊन मला हलकेपणा जाणवला.
३ आ २. ‘श्रुतीची अंतर्मनातून साधना चालू आहे’, असे जाणवणे : काही वेळाने श्रुतीच्या चेहर्यामध्ये पालट होत गेला. तिचा चेहरा आणखी पिवळसर आणि तेजस्वी दिसू लागला. ‘श्रुतीची अंतर्मनातून साधना चालू आहे आणि ती अखंड गुरुदेवांच्या अनुसंधानात आहे’, असे मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |