Texas Hanuman Statue : टेक्सास (अमेरिका) येथे भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीची स्थापना !
ह्युस्टन – अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये १८ ऑगस्ट या दिवशी भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच मूर्तीची स्थापना करण्यात आली. भगवान हनुमानाच्या या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. ही अमेरिकेतील तिसरी सर्वांत उंच मूर्ती असल्याचे म्हटले जात आहे. भगवान श्रीराम आणि सीतामाता याची भेट घालून देण्यात भगवान हनुमानाची भूमिका लक्षात घेऊन या मूर्तीला ‘स्टॅच्यू ऑफ युनियन’ असे नाव देण्यात आले आहे.
१. टेक्सासमधील शुगर लँड परिसरात असलेल्या श्री अष्टलक्ष्मी मंदिराच्या परिसरात चिन्नजीयार स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली ही श्री हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. अभिषेकप्रसंगी हेलिकॉप्टरमधून मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२. अमेरिकास्थित ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’ने एका निवेदनात म्हटले आहे की, भगवान हनुमानाची भगवान श्रीरामावर नितांत भक्ती होती. हनुमानाने भगवान श्रीरामाच्या सेवेत वेग, सामर्थ्य, धैर्य आणि बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून अनेक अतुलनीय पराक्रम केले आहेत.