Global Mpox Cases Rise : जगात ‘मंकीपॉक्स’च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विमानतळे आणि आंतरराष्ट्रीय सीमा येथे सतर्क रहाण्याचा आदेश
नवी देहली – जगात ‘मंकीपॉक्स’ या रोगाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सीमांसह देशातील सर्व बंदरे अन् विमानतळे यांवर सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकार्यांना विदेशातून येणार्या प्रवाशांमध्ये ‘मंकीपॉक्स’च्या लक्षणांविषयी सतर्क रहाण्यास सांगितले आहे.
आरोग्य मंत्रालयाने देहलीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज या ३ मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये ‘मंकीपॉक्स’च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) निर्माण केला आहे. भारतात अद्याप ‘मंकीपॉक्स’चा एकही रुग्ण आढळलेला नाही.
पाकिस्तानमध्ये आढळले ‘मंकीपॉक्स’चे ४ रुग्ण !
पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ‘मंकीपॉक्स’चे ४ रुग्ण आढळून आले आहेत. १९ ऑगस्ट २०२४ या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक संशयित रुण आढळला. ४७ वर्षीय ही व्यक्ती अलीकडेच सौदी अरेबियातून पाकिस्तानला परतली होती. यापूर्वी पाकिस्तानमध्ये ‘मंकीपॉक्स’ची ३ रुग्ण आढळले होते. हे सर्वजण खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील रहिवासी होते.
‘मंकीपॉक्स’ म्हणजे काय ?
मंकीपॉक्स हा देवीसारखा विषाणूजन्य आजार आहे. साधारणपणे या विषाणूच्या संसर्गामुळे तापासारखी लक्षणे दिसतात आणि शरिरावर पू भरलेल्या जखमा होतात. हा विषाणू ऑर्थोपॉक्स विषाणुशी संबंधित आहे.