SC On Women Doctors Safety : महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करा !
|
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने कोलकाता येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या यांवरून तीव्र चिंता व्यक्त केली. यासह महिला डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती सिद्ध करण्यासाठी ९ सदस्यीय राष्ट्रीय कृती दलाच्या स्थापनेचा आदेशही दिला. २० ऑगस्टला यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
#SupremeCourtOfIndia constitutes a 10-member national task force to ensure the safety of doctors – Urges Doctors protesting Nationwide to resume duties
Kolkata doctor rape-murder case
Supreme Court criticises the Bengal govt. and raises questions on women’s safety
The case… pic.twitter.com/t1mNPewfHL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 20, 2024
१. न्यायालयाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यपद्धती सुचवण्यासाठी या दलाची स्थापना केली. यात विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असणार आहेत. ते सार्वत्रिक स्तरावर अनुसरण करता येईल, अशा काही कार्यपद्धती सुचवतील, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
२. न्यायालयाने बंगाल सरकारला आंदोलकांवर बलपूर्वक कारवाई करण्यास मज्जाव केला आहे. डॉक्टर आणि महिला डॉक्टर यांची सुरक्षा हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे. काही पावले उचलण्यासाठी देश दुसर्या बलात्काराची वाट पाहू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
३. १४ ऑगस्टच्या रात्री रुग्णालयात झालेल्या तोडफोडीविषयीही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला. ‘रुग्णालयावर जमावाने आक्रमण केले. यामध्ये उपकरणांची हानी झाली. या वेळी पोलीस काय करत होते ? पोलिसांना सर्वप्रथम गुन्ह्याचे ठिकाण सुरक्षित करणे आवश्यक आहे’, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
४. न्यायालयाने बंगाल सराकरवरही ताशेरे ओढत म्हटले की, शवविच्छेदन अहवाल आधीच आलेला असतांना गुन्हा नोंदवण्यास विलंब का केला ? या वेळी न्यायालयाने १४ ऑगस्टच्या रात्री आर्.जी. कर रुग्णालयावर सहस्रोंच्या जमावाने केलेल्या आक्रमणाच्या चौकशीचा, तसेच बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तपासाचा स्थिती अहवाल २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले.
राष्ट्रीय कृती दलामध्ये असलेले सदस्य !
राष्ट्रीय कृती दलामध्ये डॉ. आर्. सरीन, डॉ. डी. नागेश्वर रेड्डी, डॉ. एम्. श्रीनिवास, डॉ. प्रतिमा मूर्ती, डॉ. गोवर्धन दत्त पुरी, डॉ. सौमित्र रावत, प्रा. अनिता सक्सेना, प्रा. पल्लवी सप्रे आणि डॉ. पद्मा श्रीवास्तव यांचा समावेश आहे.