सकाळच्या वेळेत पादचारी मार्ग अडवून शिवाजी पार्क (दादर) येथे अंनिसने केले आंदोलन !
अन्यांना विवेकाचे तत्त्वज्ञान पाजळणार्या अंनिसची ‘अविवेकी’ कृती !
मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) : सकाळच्या वेळेत शिवाजी पार्क येथे अनेक स्थानिक नागरिक आणि खेळाडू ‘मॉर्निंग वॉक’साठी (चालण्यासाठी) येतात. या रहदारीच्या वेळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शिवाजी पार्कच्या बाजूला पादचारी मार्ग (पदपथ) अडवून तेथे आंदोलन केले. हा भाग ‘शांतता झोन’मध्ये येत असूनही आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
अंनिसच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेल्या अनुमती मागणी पत्रामध्ये ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात येणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र येथे जमलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘मॉर्निंग वॉक’ केलेच नाही ! उलट येथील कै. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करत पदपथ अडवला. सकाळी ७.१५ पासून अंनिसचे कार्यकर्ते पादचारी मार्गावर घोळका करून उभे होते. सकाळी ७.५० ते ८.१० या वेळेत हातात फलक धरून कार्यकर्त्यांनी ‘शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’, ‘जितेंगे भाई जितेंगे’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, आदी घोषणा दिल्या. २० मिनिटांत निदर्शने आटोपती घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पादचारी मार्ग अडवून तेथेच वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना ‘बाईट्स’ (मुलाखती) दिल्या. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पादचारी मार्ग अडवल्यामुळे सकाळी ‘मॉर्निग वॉक’साठी आलेल्या नागरिकांची अडचण झाली.