पितृतुल्य भासणारा देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम !
‘देवद (पनवेल) आश्रम हा सनातनचा पहिला मोठा आश्रम असून हा आश्रम बांधून जवळपास २२ वर्षे झाली आहेत. भारतभरातून अनेक साधक येथे साधनेसाठी येत असतात आणि नंतर त्यातील काही साधक पूर्णवेळ साधना करू लागतात. अशा साधकांपैकी मीही एक पूर्णवेळ साधना करू लागलेला साधक आहे. माझी साधना देवद आश्रमातूनच चालू झाली.
१. देवद आश्रमाच्या नूतनीकरणासाठी आल्याचे समजल्यावर देवद आश्रमाला आनंद होऊन त्याने सूक्ष्मातून मिठी मारणे
देवद (पनवेल) आश्रमाच्या नूतनीकरणानिमित्त असलेल्या बांधकाम सेवेसाठी मला देवद येथील आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्या सेवेनिमित्त माझे देवद आश्रमात सर्वत्र फिरणे झाले. ‘आम्ही प्रत्यक्ष विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रहात असलेल्या भूवैकुंठरूपी सनातनच्या रामनाथी आश्रमातून देवद आश्रमाच्या नूतनीकरणासाठी आलो आहोत’, हे समजल्यावर देवद आश्रम फार आनंदी झाला आणि ‘त्याने मला सूक्ष्मातून आनंदाने मिठीत घेतले’, असे मला जाणवले. त्यामुळे माझा भाव जागृत झाला.
२. पितृतुल्य देवद आश्रम !
मला देवद आश्रम पितृतुल्य भासला. अनेक नैसर्गिक संकटे येऊनही देवद आश्रम एका पित्याप्रमाणे खंबीरपणे उभा आहे. ‘तो पित्याप्रमाणे उभा राहून घट्ट धरून साधकांची काळजी घेतो’, असे मला जाणवले.
३. ‘आम्ही देवद आश्रमाच्या नूतनीकरणाच्या सेवेसाठी गेलो आहे’, हे प.पू. डॉक्टरांना कळल्यावर त्यांनाही पुष्कळ आनंद झाला.
४. कृतज्ञता
‘प.पू. डॉक्टरांनी मला पितृतुल्य अशा देवद आश्रमाच्या बांधकामाच्या सेवेची संधी दिली’, यासाठी मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. नीलेश शांताराम सुर्वे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.२.२०२३)
|