हसावे कि रडावे ?
‘सासरी जातांना नवरीने कसे रडावे ?’, यासाठी ७ दिवसांचा ‘क्रॅश कोर्स’ भोपाळमध्ये आयोजित करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले होते. यामध्ये ‘रडायचे कसे ?’, ‘रडतांना विशिष्ट नक्कल कशी करायची ?’, ते शिकवण्यात येणार होते. सध्या मुली सासरी जातांना रडत नसल्याने हा शिकवणीवर्ग ठेवण्यात आला होता. अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्याची वेळ येणे, हेच मुळात दुर्दैवी आहे. ‘उपक्रमाचे वृत्त वाचूनच हसावे कि रडावे ?’, असा प्रश्न पडला. सासरी जातांना नववधू बावरलेली असते. नवीन संसार, नवी माणसे, नवे आयुष्य यांना आरंभ होणार असतो. त्यासाठी माहेराला निरोप द्यावा लागतो. त्या वेळी आपसूकच अश्रूंचा बांध फुटतो आणि मग आपल्या माहेरच्या माणसांजवळ जाऊन किंवा त्यांना बिलगून नवरी तिची भावनिकता मोकळी करत असते. त्यात कृत्रिमता किंवा तांत्रिकता नसते. त्यात असतो, तो केवळ आपलेपणा आणि निरागसपणा ! हे आधीच्या काळात अगदी सहजरित्या होत असे; पण आता मोठ्या वयात लग्न होत असल्याने, तसेच मुली अनुभवी, उच्चशिक्षित झाल्याने सासरी जातांना रडू येणेही दुर्मिळ झाले आहे. यामागील कारणांचा विचार करायला हवा. सध्या समाज भावनाशील अल्प आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाला आहे. एकमेकांमध्ये आपलेपणा न्यून झाल्याने भावना व्यक्तच होत नाहीत किंवा जरी त्या व्यक्त झाल्या, तर त्यांत कृत्रिमता किंवा दिखाऊपणा असतो. यामुळेच तर असे उपक्रम राबवण्याची वेळ येते. जर खरोखर आतून प्रेम असेल किंवा एखाद्या प्रती भावनिक ओढ असेल, तर ‘आता तुम्ही रडा’, असे सांगावेच लागणार नाही.
मुलगी लहानपणापासून घरी वावरते, तिचे दुडूदुडू धावणे ते तिचे शाळा-महाविद्यालय, नोकरी इथपर्यंतचे आयुष्य पालकांनी जवळून अनुभवलेले असते. त्यामुळे मुलीच्या विरहाने पालकांनाही रडू यायचे. आता आई-वडील आणि मुले यांच्यातील ओढ काळानुसार अल्प होत चालली आहे. मुले लवकर स्वावलंबी होऊन आपापले मार्ग निवडतात. पालकही त्यांची नोकरी-व्यवसाय यांत गुंतलेले असतात. त्यामुळे एकमेकांसाठी वेळ देणे अल्प झाले आहे. यात आणखी भर म्हणजे भ्रमणभाषची ! त्याच्या विश्वात एकदा डोके खुपसले की, शेजारी काय चालले आहे, याचे भान नसते. कुणालाच कुणासाठी वेळ राहिलेला नाही. वेळ काढण्यासाठी आपलेपणा, प्रेम असावे लागते. तेच नसेल, तर मग अश्रू तरी येणार कुठून ? काळानुसार समाजमन संवेदनाहीन होत आहे. नात्यातील घट्ट वीण हळूहळू सैल होत आहे. ‘कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी’, अशी गत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही नात्यात एकमेकांप्रती प्रेमभावना वृद्धींगत होण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केल्यास असे ‘कोर्स’ राबवण्याची वेळच येणार नाही, हेच खरे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.