पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज हे वाळवे बद्रुक (जिल्हा कोल्हापूर) येथील आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तसेच पंढरपूर येथील नामदेव टेंभूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांप्रदायिक अनुयायी बनले. त्यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
सर्वां ठायी एक आत्मा । निर्गुण त्याची प्रतिमा ।। १ ।।
अवघा भाव त्याला हवा । सर्व भावे त्याला भजावा ।। २ ।।
अखंड नाम चिंतन । होतील देव प्रसन्न ।। ३ ।।
होईल ते आत्मज्ञान । प्राप्त होतील नारायण ।। ४ ।।
ज्यांनी जाणला आत्माराम । त्यांना लाभले मुक्तीधाम ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)