पुणे येथील नगर रस्त्यावरील ‘फिनिक्स मॉल’ बाँबने उडवून देण्याची धमकी !

मॉलमध्ये कोणतीही बाँबसदृश्य वस्तू आढळून आली नाही !

पुणे – येथील विमाननगर भागातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी विमाननगर पोलिसांनी धमकीचा ई-मेल पाठवणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. फिनिक्स मॉलमध्ये व्यवस्थापक असलेल्या आदित्य शितोळे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १७ ऑगस्टला दुपारी शितोळे यांनी मॉलमधील वरिष्ठ व्यवस्थापक संदीप सिंह यांना आलेल्या ई-मेलची पहाणी केली. तेव्हा मॉलमध्ये बाँब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल हिडनस बोन नावाच्या व्यक्तीने मॉल प्रशासनाला पाठवल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मॉल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

बाँबशोधक-नाशक पथकाने (बी.डी.डी.एस्.) मॉलची पडताळणी केली. तेव्हा मॉलमध्ये बाँबसदृश्य वस्तू आढळून आली नाही. ‘मी आयुष्याला कंटाळलो आहे. मॉलमधील कुणी वाचू शकणार नाहीत. पोगो आणि नोरो मला त्रास देत आहेत,’ असे ई-मेलमध्ये म्हटले होते. पोलिसांनी तांत्रिक अन्वेषण चालू करून धमकीचा ई-मेल पाठवणार्‍याचा शोध चालू केला आहे.

संपादकीय भूमिका

कुणीही उठतो आणि बाँब ठेवल्याची धमकी देतो, यावरून कुणालाही पोलीस आणि कायदा यांचे भय नाही, हेच लक्षात येते.