मोदी सरकारकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज मार्गाला हिरवा कंदील !
पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या मार्गाला संमती देण्यात आली. हा प्रकल्प एकूण २ सहस्र ९५४ कोटी रुपयांचा असून तो फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होईल. स्वारगेट ते कात्रज या मार्गाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्त्वतः संमती दिली होती. त्यानंतर या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून या मेट्रो मार्गाचे काम चालू होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच हा विस्तारित मार्ग असणार आहे. हा संपूर्ण भुयारी मार्ग असेल आणि त्याची लांबी ५ किमी ४६ मीटर असेल अन् ३ भूमीगत स्थानके या मार्गावर असतील.
‘महामेट्रो’ने या मार्गासाठी रचना सल्लागार नेमण्यासाठी निविदा गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काढली. त्यात मार्गाची उभारणी, बोगद्यातील पर्यावरण नियंत्रण यंत्रणा, इमारतीची व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानकांची रचना यांचे उत्तरदायित्व रचना सल्लागाराकडे असणार आहे. ही निविदा मेट्रो मार्गाला संमती मिळण्याआधीच काढण्यात आली असल्याने या मार्गाचे काम चालू होणार आहे.