योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !
१. स्वप्नात वशिष्ठऋषींनी साधिकेला दर्शन देणे आणि ‘या जन्मात मी प.पू. दादाजी यांच्या रूपात तुझ्या समवेत आहे’, असे त्यांनी सांगणे
‘अनुमाने वर्ष १९७७ मध्ये एके दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला एका घनदाट अरण्यात एक आश्रम दिसला. तिथे भगव्या आणि शुभ्र रंगांची वस्त्रे धारण केलेले अनेक साधक होते. मी त्या आश्रमाच्या दिशेने जात असतांना एका भव्य शिळेवर मला एक तेजस्वी ऋषिवर्य ध्यानमग्न स्थितीत दिसले. मी त्यांना वंदन केले. तेवढ्यात त्यांनी डोळे उघडले आणि मला म्हणाले, ‘मी तुझीच वाट पहात होतो.’ त्यावर मी म्हणाले, ‘गुरुवर्य, मी आपल्याला ओळखले नाही.’ ते मला म्हणाले, ‘अगं, आपली जन्मोजन्माची ओळख आहे. मी वशिष्ठऋषि ! या जन्मातही मी तुझ्या समवेत तुझे गुरुवर्य प.पू. दादाजी यांच्या रूपात आहे.’
२. झोपेतून जागे झाल्यावर प.पू. दादाजींची नावे आपोआप लिहिली जाणे
मी अकस्मात् जागी झाले. तेव्हा पहाटेचे ४.३० वाजले होते. तेव्हा कसे कुणास ठाऊक; पण माझ्या शेजारी कागद आणि लेखणी होती. त्या वेळी माझ्याकडून प.पू. दादाजींची पुढील नावे आपोआप लिहिली गेली. तो जीर्ण कागद अजूनही माझ्याकडे आहे.
गुरुवर्य, लक्ष्मी पुरुषोत्तम प.पू. दादाजींच्या श्री चरणी,
हे लक्ष्मीपतये तुभ्यं नमः ।
श्रीपादचन्द्राय तुभ्यं नमः ।
गणेशपुत्राय तुभ्यं नमः ।
सावित्रीतनयाय तुभ्यं नमः।
भक्तप्रियाय तुभ्यं नमः ।
पीडाहारिणे तुभ्यं नमः ।
आनन्दप्रियाय तुभ्यं नमः ।
कुबेरसख्यै तुभ्यं नमः ।
वशिष्ठात्मने तुभ्यं नमः ।
जीवात्मने तुभ्यं नमः।
निर्गुणस्वरूपाय तुभ्यं नमः ।
श्रीदत्तप्रियाय तुभ्यं नमः ।
अवधूतस्वरूपाय तुभ्यं नमः ।
लक्ष्मीप्रियाय विद्महे पुरुषोत्तमाय धीमहि
तन्नो श्रीपादः प्रचोदयात् ॐ ।
३. प.पू. दादाजींनी साधिकेला वरील स्वप्नाचा विसर पाडणे आणि कालांतराने तिला त्याविषयीचे स्मरण करून देणे
मला पडलेले स्वप्न मी प.पू. दादाजी यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘ही घटना कुणालाही सांगायची नाही. मी सांगेन, तेव्हा इतरांना सांगा.’’ त्यानंतर मी हे सर्व विसरले. जणूकाही प.पू. दादाजी यांनी मला या सर्वांची विस्मृती करवली. २०.५.२०१९ मध्ये प.पू. दादाजी यांनी देहत्याग केला आणि वर्ष २०२२ मध्ये मला हे सर्व परत आठवले. ‘ही प.पू. दादाजींची इच्छा असावी’, असे मला वाटले. यावरून ‘आपण सर्वांनी प.पू. दादाजींच्या रूपातून सप्तर्षींमधील वशिष्ठऋषींचा सहवास कलियुगात अनुभवला’, असे मला वाटले.’
– सौ. विजया भूपेन पांचाळ (वय ७४ वर्षे), बोरीवली, मुंबई. (२०.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |