DYFI PORK CHALLENGE : केरळमध्ये साम्यवाद्यांकडून डुकराचे मांस खाण्याचे आव्हान : मुसलमान संतप्त !

वायनाड (केरळ) : येथील ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’ने (‘डी.वाय.एफ.आय.’ने) डुकराचे मांस खाण्याविषयी चालू केलेल्या ‘पोर्क चॅलेंज’ या कार्यक्रमावर एका मुसलमान संघटनेशी संबंधित इस्लामी नेत्याने टीका केली. वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनानंतर घरांच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांमध्ये सरकारला साहाय्य करण्यासाठी केरळमधील सत्ताधारी ‘सीपीआय (एम्)’ची युवा शाखा असलेल्या ‘डी.वाय.एफ.आय.’ने लोकांकडून देणग्या गोळा करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यांपैकी ‘पोर्क चॅलेंज’ हा एक कार्यक्रम आहे.

१. मुसलमान संघटना ‘सुन्नी युवाजन संगम’चे (‘एस्.वाय.एस्.’चे) राज्य सचिव नसर फैजी कुडथाई यांनी ‘डी.वाय.एफ.आय.’च्या या कार्यक्रमावर टीका केली. नासर फैजी कुडथाई म्हणाले की, साम्यवादी संघटना या कार्यक्रमाच्या नावाखाली ‘ईर्शनिंदा’ करण्याचा प्रयत्न करत आहे. हा मुसलमानांचा अपमान आहे.

२. ‘डी.वाय.एफ.आय.’च्या कोठामंगलम् समितीचे सचिव रंजित यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘पोर्क चॅलेंज’ कार्यक्रम यशस्वी झाला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी ३७५ रुपये प्रति किलो दराने ५१७ किलो डुकराचे मांस विकले. वायनाडमधील बाधित लोकांसाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी अनेक आव्हाने आणि उत्सव यांचे आयोजन केले आहे. येथे डुकराच्या मांसाची मोठी बाजारपेठ आहे, हे लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असेही रंजित यांनी सांगितले.